
लातूर, 25 एप्रिल, (हिं.स.)। लातूर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी लातूर पोलीस दलाच्या वतीने दि. २४ ते २५ एप्रिल २०२६ च्या मध्यरात्री अचानकपणे जिल्हाभरात ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या व्यापक कारवाईमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये धास्ती निर्माण झाली असून नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये तसेच अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. सदर मोहिमेत लातूर जिल्हा पोलीस दलातील एकूण 31 पोलीस अधिकारी ,106 पोलीस अंमलदार आणि 88 होमगार्ड हे सहभागी झाले होते.
या ऑपरेशनदरम्यान पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांवर अचानक भेट देऊन त्यांच्या हालचालींची पडताळणी करण्यात आली. ते सध्या कुठे आहेत, कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतात, त्यांच्या वर्तनात काही संशयास्पद बदल आहे का याबाबत सखोल चौकशी करण्यात आली. विशेषतः मालमत्तेविषयक गुन्हे करण्याची शक्यता असलेल्या व्यक्तींवर लक्ष केंद्रीत करून त्यांना समज देण्यात आली, ज्यामुळे संभाव्य गुन्हे रोखण्यास मोठी मदत झाली.
या मोहिमेदरम्यान ६ जणांवर शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्या ताब्यातील अवैध शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने शस्त्रे बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले.
मालमत्तेविषयक गुन्हे करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या वावरणाऱ्या ११ व्यक्तींविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२(क) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
ऑपरेशनअंतर्गत 127 रेकॉर्डवरील घरफोडी व इतर गुन्ह्यांतील सराईत आरोपींच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांच्या हालचालींची माहिती घेण्यात आली. तसेच त्यांना भविष्यात कोणतेही समाजविघातक कृत्य न करण्याबाबत समज देण्यात आली.
११० लॉजेस व हॉटेल्सची तपासणी करण्यात आली असून ३० संवेदनशील (मर्मस्थळ) ठिकाणांना भेटी देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात विविध ३१ ठिकाणी नाकाबंदी करून ८२७ संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे संशयित हालचालींवर नियंत्रण ठेवण्यास मदत झाली.
तसेच मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या 22 वाहनचालका विरुद्ध खटले दाखल करण्यात आले आहेत.
लातूर पोलिसांनी राबविलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये स्पष्ट संदेश गेला असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा प्रकारच्या ‘ऑलआऊट’ व ‘कोंबिंग ऑपरेशन’ पुढेही सातत्याने राबवून गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यात येणार असल्याचे लातूर पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis