
ठाणे, 25 एप्रिल, (हिं.स.)। प्रतिकुल परिस्थितीत कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलेले अस्सल हापूस आंब्याचे उत्पादन ठाणेकरांसाठी पुन्हा एकदा उपलब्ध झाले आहे. संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १९वा आंबा महोत्सव १ ते १० मे या कालावधीत गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आल्याची माहिती आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंबा महोत्सवात शेतकरी ते ग्राहक अशी थेट भेट होणार असल्याने ठाणेकरांना अस्सल हापूस आंबा वाजवी दरात चाखायला मिळणार आहे. महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच, आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, पापड, पोहे, अशा विविध दर्जेदार कोकणी उत्पादनांचे ४५ स्टॉल्स लावण्यात येणार आहेत.
गेल्या काही वर्षांत प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचे उत्पादन घटत चालले आहे. कोकणात एकूण एक लाख ८० हजार हेक्टर जमिनीवर आंब्याची लागवड केली जाते. २०२३ साली कोकणातील आंब्याचे उत्पन्न दोन लाख ५६ हजार मेट्रीक टन होते. यातील १९८ कोटी रुपयांची आंब्याची विक्री मुंबई व भारतभर केली गेली आणि ७९ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला. दरवर्षी हे उत्पन्न घटत जाऊन २०२४ मध्ये एक लाख २८ हजार मेट्रीक टन होते आणि १२६ कोटींचा आंबा विकला गेला तर ५४ कोटींच्या आंब्याची निर्यात केली गेली. २०२५ मध्ये उत्पादन एक लाख १० हजार मेट्रीक टन झाले असून १०० कोटी रुपयांची आंबा विक्री देशभर केली गेली तर ४५ कोटी रुपयांचा आंबा निर्यात केला गेला.
यावर्षी अवेळी पडलेला पाऊस, ढगाळ वातावरणामुळे काही ठिकाणी मोहोर जळून गेला तर काही ठिकाणी फळगळ झाली व थ्रीप्स रोग, तुडतुडा किटकांच्या प्रादुर्भावामुळे पंधरा टक्केच आंबा पीक हाती लागले आहे. त्यामुळे मागील ११ वर्षांपासून सातत्याने कोकणातील शेतकरी आर्थिक संकटात आहे. त्यामुळे या साऱ्या परिस्थितीचा चोखंदळ आणि समंजस ठाणेकर सहानुभूतीने विचार करेल व आपली जास्तीत जास्त खरेदी आंबा महोत्सवात करून कोकणातील शेतकऱ्यांना पाठबळ देईल, असा विश्वास आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेत संस्कार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांच्यासह आमदार निरंजन डावखरे, माजी उप महापौर सुभाष काळे, अशोक भोईर, नगरसेवक सीताराम राणे, भरत चव्हाण, विकास पाटील, कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, संस्कार संस्थेचे महेश विनेरकर, संतोष साळुंखे, कैलास म्हात्रे, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर