मेक्सिकोमधील ड्रग कार्टेलचा म्होरक्या ऑडियास फ्लोरेस सिल्वाला अटक
मेक्सिको सिटी , 29 एप्रिल (हिं.स.)।मेक्सिकोमधील ड्रग्जच्या जगतात कुख्यात असलेल्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलच्या मोठ्या सरगन्यांपैकी एक ऑडियास फ्लोरेस सिल्वा याला सैन्याने अटक केली आहे. तो ‘एल जार्डिनेरो’ म्हणजेच ‘माळी’ या नावाने ओळखला जात होता. त
मेक्सिकोच्या कुख्यात ड्रग्ज तस्कर ऑडियास फ्लोरेस सिल्वाला अटक


मेक्सिको सिटी , 29 एप्रिल (हिं.स.)।मेक्सिकोमधील ड्रग्जच्या जगतात कुख्यात असलेल्या जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलच्या मोठ्या सरगन्यांपैकी एक ऑडियास फ्लोरेस सिल्वा याला सैन्याने अटक केली आहे. तो ‘एल जार्डिनेरो’ म्हणजेच ‘माळी’ या नावाने ओळखला जात होता. तो टोळीचा प्रमुख एल मेंचो याचा अत्यंत जवळचा मानला जात होता. त्याच्या अटकेनंतर मेक्सिकोतील अनेक भागांत हिंसाचाराच्या किरकोळ घटना समोर आल्या आहेत. अमेरिकेने फ्लोरेस सिल्वा याच्यावर सुमारे ५ दशलक्ष डॉलर (सुमारे ५० कोटी रुपये) इतके बक्षीस जाहीर केले होते.

फ्लोरेस सिल्वा हा कार्टेलचा प्रादेशिक कमांडर होता आणि त्याला एल मेंचोचा उत्तराधिकारी मानले जात होते. विशेष म्हणजे सुरक्षा दलांनी त्याला एखाद्या मोठ्या अड्ड्यावर नव्हे, तर रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात लपलेला असताना पकडले.एल मेंचोच्या मृत्यूनंतर कार्टेलची सूत्रे तोच हातात घेईल, असे मानले जात होते. मात्र, त्याच्या अटकेमुळे टोळीला मोठा धक्का बसला आहे. जलिस्को न्यू जनरेशन कार्टेल हे जगातील सर्वात धोकादायक ड्रग्ज टोळ्यांपैकी एक मानले जाते.

अमेरिकन यंत्रणांच्या माहितीनुसार, हे कार्टेल अमेरिका सहित १०० हून अधिक देशांमध्ये ड्रग्जचा व्यवसाय करते. मेक्सिकोच्या ३२ पैकी २१ राज्यांत त्यांचे जाळे पसरले असून त्यामुळे ही टोळी अत्यंत प्रभावशाली मानली जाते. ऑडियास फ्लोरेस सिल्वा याचे वय सुमारे ३१ वर्षे असून तो मिचोआकान राज्यातील रहिवासी आहे. कमी वयातच त्याने ड्रग्जच्या व्यवसायात पाऊल ठेवले आणि अफूच्या शेतीपासून सुरुवात केली. यापूर्वी तो अमेरिकेत अटक होऊन तुरुंगवासही भोगला आहे.

फ्लोरेस सिल्वा हा केवळ ड्रग्ज तस्करीतच नव्हे, तर खंडणी वसुली, तेल चोरी आणि अपहरण यांसारख्या गुन्ह्यांतही सहभागी होता. त्याला कार्टेलचा सुरक्षा प्रमुखही मानले जात होते. अनेक राज्यांतील नेटवर्क तो सांभाळत होता. त्याने नायरित भागाला आपला बालेकिल्ला बनवले होते आणि फेंटानिल तयार करण्यासाठी येणाऱ्या रसायनांवर त्याचे नियंत्रण होते.फ्लोरेस सिल्वा याला ‘एल जार्डिनेरो’ हे नाव त्याच्या सुरुवातीच्या कामामुळे मिळाले. सुरुवातीच्या काळात तो अफू आणि गांजाची शेती करवून घेत असे. त्यामुळे त्याला ‘माळी’ असे संबोधले जाऊ लागले. एल मेंचोच्या मृत्यूनंतर टोळीची सत्ता त्याच्याकडे येईल, असे मानले जात होते.

अमेरिका २०२१ पासूनच त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती आणि मेक्सिकोवर दबाव टाकत होती. अमेरिकन सरकारने त्याला धोकादायक ड्रग्ज तस्कर घोषित करून त्याची मालमत्ता जप्त केली होती. त्याच्यावर कोलंबियापासून अमेरिकेपर्यंत ड्रग्ज तस्करीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

दोन महिन्यांपूर्वी एल मेंचोच्या मृत्यूनंतर संपूर्ण मेक्सिकोमध्ये हिंसाचार भडकला होता. आता फ्लोरेस सिल्वाच्या अटकेनंतरही नायरित राज्यात जाळपोळीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, त्याच्या अटकेदरम्यान कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. सुरक्षा यंत्रणांसाठी ही मोठी कामगिरी मानली जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande