
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) वीजबिल थकवणाऱ्या ग्राहकांविरोधात महावितरणने कठोर भूमिका घेत मोठा निर्णय जाहीर केला आहे. परिमंडळातील तब्बल १ लाख ७१ हजार डिफॉल्टर ग्राहकांकडे ३५ कोटी २३ लाख रुपयांची थकबाकी असून, या ग्राहकांची नावे सार्वजनिक करण्यासह कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी सांगितले की, वीजबिल वसुलीवरच महावितरणचे अस्तित्व अवलंबून आहे. अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी ग्राहकांनी वेळेत बिल भरणे आवश्यक आहे. मात्र, वारंवार मोहिमा राबवूनही अनेक ग्राहक बिल भरत नसल्याने कर्मचाऱ्यांना वसुलीसाठी पाठवावे लागत आहे.
महावितरणने पहिल्या टप्प्यात डिफॉल्टर ग्राहकांची नावे वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संबंधित शाखा कार्यालयांच्या नोटीस बोर्डवरही ही नावे प्रदर्शित केली जाणार आहेत. वीज कर्मचाऱ्यांशी वाद घालणे किंवा धमकी देण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या मदतीने कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
परिमंडळात अमरावती जिल्ह्यात ६८,६७२ ग्राहकांकडे ११ कोटी ३ लाख, तर यवतमाळ जिल्ह्यात १,०२,३३८ ग्राहकांकडे २४ कोटी २० लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये ९,४२३ ग्राहकांनी वर्षभरात एकदाही बिल भरलेले नाही. महावितरणने थकबाकीदारांनी तत्काळ बिल भरावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी