
अकोला, 03 एप्रिल (हिं.स.) :अकोला येथील खाण व क्रशर उद्योग संघाने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असून पैशांची मागणी केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
उद्योजकांच्या म्हणण्यानुसार, ते शासनाच्या नियमानुसार रॉयल्टी भरत असतानाही अधिकाऱ्यांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात आहे. तसेच, मागणी न पूर्ण केल्यास धमकावले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा म्हणून अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सादर करण्यात आली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये उद्योजकांकडून पैसे गोळा केल्याचा उल्लेख असून, अधिकाऱ्यांनी स्पष्ट शब्दांत न बोलता नाराजी व्यक्त करत व्यापाऱ्यांवर दबाव टाकल्याचे दिसून येते.
अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या कथित त्रासाला कंटाळून अखेर संघटनेने पोलिसांकडे धाव घेतली आहे. आता या प्रकरणात पोलीस कोणती कारवाई करतात आणि ऑडिओ क्लिपच्या तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे