अमरावती : बच्चू कडूंनी फेटाळले हत्येच्या कटाचे आरोप
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीमध्ये आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळून लावत
ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) : अमरावतीमध्ये आ. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्यावर भाजप आमदाराच्या भावाच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

चांदूर बाजार पोलीस ठाण्यात अभिजीत दिगंबरराव तायडे (वय ४०, रा. कोल्हा काकडा) यांच्या तक्रारीवरून माजी आमदार बच्चू कडू, शुभम उर्फ गोलू माहोरे आणि एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपघाताचा बनाव करून हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, अचलपूर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे चुलतभाऊ अभिजीत तायडे त्यांच्या जनसंपर्कासाठी विविध कार्यक्रम आयोजित करतात. राजकीयदृष्ट्या आमदार तायडे यांना कमकुवत करण्याच्या उद्देशाने अभिजीत तायडे यांच्यावर अपघात करून हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात काही तथ्य आढळल्याने पोलीसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ५५, ५८ व ६१ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे

याप्रकरणावर प्रतिक्रिया देताना कडू म्हणाले की, “कट, कारस्थान करणे हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्तदान करणारे लोक आहोत, कोणाचा जीव घेणारे नाही.” त्यांनी या आरोपांमागे राजकीय हेतू असल्याचा दावा केला. कडू यांनी पुढे आरोप केला की, त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्यासाठी आणि अटक करण्यासाठी हे षडयंत्र रचण्यात आले आहे. “शेतकऱ्यांना दीड लाख रुपये प्रोत्साहन मिळावे यासाठी मी आंदोलन उभारणार होतो. त्यामुळेच माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप कडू यांनी केला.तसेच, संभाव्य कारवाईबाबत इशारा देताना ते म्हणाले का, जर अशा प्रकारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला, तर आम्ही स्वतःहून अटक देऊ. प्रभू रामचंद्राच्या राम मंदिरातून अटक करून घेऊ असा इशारा त्यांनी दिला.

याशिवाय, कडू यांनी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एका कार्यकर्त्याला आमदाराकडून फोन करून मोबाईल व रेकॉर्डिंग मागविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. सत्ता तुमची, एसपी तुमचा, फॉरेन्सिक लॅब तुमची असे म्हणत त्यांनी यंत्रणांच्या भूमिकेवर टीका केली.दरम्यान, या प्रकरणामुळे अमरावतीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande