
चंद्रपूर, ३ एप्रिल (हिं.स.) : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे अवैध सावकारांच्या ताब्यातून सुटण्यासाठी कंबोडियामध्ये जाऊन आपले मूत्रपिंड विकले होते. मात्र अद्यापही त्यांचा त्रास संपलेला नाही. हतबल होऊन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितली आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवैध सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे रोशन कुडे यांना न्यायाची आशा वाटू लागली होती, पण दीड महिना उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला. सावकार अजूनही मोकाट असून प्रशासकीय यंत्रणा ढिम्म असल्याची संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली. रोशन कुडे यांची संपूर्ण उपजीविका शेतीवर अवलंबून आहे. अवैध सावकारांनी त्यांच्या शेतीवर ताबा मिळवल्याने उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. गेल्या चार महिन्यांपासून ते जिल्हाधिकारी कार्यालय आणि विविध विभागांत न्यायासाठी चक्कर मारत आहेत, पण अद्याप त्यांना शेती परत मिळालेली नाही.-------------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव