अमरावतीत काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ वेगात; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर तसेच महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध मुद
अमरावतीत काँग्रेसचे ‘संघटन सृजन अभियान’ वेगात; पदाधिकारी-कार्यकर्त्यांना मार्गदर्शन


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.)। काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभर तसेच महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या ‘संघटन सृजन अभियान’ अंतर्गत अमरावती ग्रामीण काँग्रेस कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी विविध मुद्द्यांवर सखोल चर्चा करत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीला आमदार भाई जगताप यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच खासदार बळवंत वानखडे, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, निष्ठावान कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत पक्ष संघटनेचे बळकटीकरण, तळागाळातील कार्यकर्त्यांशी अधिक प्रभावी समन्वय साधणे, तसेच आगामी राजकीय धोरणांची आखणी यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शन करताना नेत्यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक कामावर अधिक भर देण्याचे आवाहन केले. प्रत्येक गावपातळीवर पक्षाची पकड मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, जनतेच्या प्रश्नांशी थेट जोडले जावे आणि पक्षाच्या विचारधारेचा प्रसार अधिक प्रभावीपणे करावा, असेही यावेळी सांगण्यात आले. बैठकीदरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनीही आपले अनुभव व विचार मांडत संघटन अधिक सक्षम करण्यासाठी सूचना केल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. ‘संघटन सृजन अभियान’ हे केवळ कार्यक्रम न राहता तो प्रत्येक कार्यकर्त्याच्या कृतीत उतरला पाहिजे, असा सूरही बैठकीत उमटला. या बैठकीतून अमरावती जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक प्रभावी आणि मजबूत करण्याचा संकल्प करण्यात आला. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातून पक्षाला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande