
अमरावती, 03 एप्रिल, (हिं.स.) - अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा आणि कार्याचा देशभर प्रसार करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या समितीचे प्रमुख व प्रचारक आदरणीय श्री जनार्दन बोथे गुरुजी यांना भारत सरकारचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान केला. यावेळी भाजपा अमरावती जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख तसेच खासदार डॉ. अनिलजी बोंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सन्मानामुळे मोझरी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून बोथे गुरुजींच्या कार्याचे कौतुक करण्यात येत आहे. यावेळी स्थानिक कार्यकर्ते, नागरिक आणि समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बोथे गुरुजींच्या सामाजिक, अध्यात्मिक आणि जनजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांचे अभिनंदन केले.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोझरी येथील विविध विकासकामांना गती देण्यासाठी शासन पातळीवर आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करत, तुकडोजी महाराजांचे विचार देश-विदेशात पोहोचवण्यासाठी समितीसोबत खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले. खासदार डॉ. अनिलजी बोंडे यांनीही बोथे गुरुजींच्या कार्याचे कौतुक करत, त्यांच्या मार्गदर्शनातून समाजाला नवी दिशा मिळत असल्याचे नमूद केले.
यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी श्री जनार्दन बोथे गुरुजी यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे मोझरीसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, बोथे गुरुजींच्या कार्याला आणखी बळ मिळणार असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले.
--------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी