
बीड, 03 एप्रिल (हिं.स.) : बीड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी राबविण्यात आलेल्या ११४ कोटी रुपयांच्या अमृत अटल जलवाहिनी योजनेतील गोंधळ उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अखेर सक्रिय झाले आहे. नगरपालिकेच्या विशेष सभेत ठेकेदाराविरुद्ध कारवाईचा ठराव मंजूर झाल्यानंतर मराठवाडा विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा पलांडे यांनी बीड येथे भेट देत योजनेची प्रत्यक्ष पाहणी केली.
ही योजना
२०१७ मध्ये सुरू झाली असून दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, आठ वर्षांनंतरही शहरातील अनेक भागांमध्ये पाणी पोहोचलेले नाही. ४० किलोमीटर लांबीची मुख्य जलवाहिनी आणि २४१ किलोमीटरची अंतर्गत जलवाहिनी उभारूनही विस्तारीत भागातील जलकुंभ अद्याप कोरडेच असल्याचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर मनीषा पलांडे यांनी काडीवडगाव पंप हाऊस तसेच इट आणि नाळवंडी नाका येथील जलकुंभांची पाहणी केली. यावेळी आमदार विजयसिंह पंडित यांनी त्यांची भेट घेऊन ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचा निषेध नोंदवला. तसेच प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावर मुख्य अभियंता पलांडे यांनी उर्वरित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान उपनगराध्यक्ष विनोद मुळूक, सभापती शेख निजाम, फारूक पटेल आणि अमर नाईकवाडे उपस्थित होते.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis