एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप : भारताचे तीन पदक निश्चित; निखत, प्रिया आणि प्रीती उपांत्य फेरीत
नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.)। मंगोलियातील उलानबटार येथे सुरू असलेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके निश्चित केली आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी निखत जरीन, प्रिया आणि प्रीती पवार यांनी आपापले सामने
Indian Boxer Nikhat Zareen


नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.)। मंगोलियातील उलानबटार येथे सुरू असलेल्या एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 स्पर्धेत भारताने उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके निश्चित केली आहेत. स्पर्धेच्या पाचव्या दिवशी निखत जरीन, प्रिया आणि प्रीती पवार यांनी आपापले सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महिलांच्या 51 किलो गटात निखत जरीन हिने शानदार कामगिरी करत फिलिपिन्सच्या शियान बागुहिन हिला पहिल्याच फेरीत आरएससी द्वारे पराभूत केले. आता उपांत्य फेरीत तिचा सामना चीनच्या वू यू हिच्याशी होणार आहे, जी पॅरिस 2024 ऑलिम्पिक मधील सुवर्णपदक विजेती आहे.

महिलांच्या 60 किलो गटात प्रिया हिने संयम आणि उत्कृष्ट रणनीतीचे प्रदर्शन करत चीनच्या चेंग्यू यांग हिला 4-1 अशा फरकाने पराभूत केले. आता अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी तिचा सामना मंगोलियाच्या नामून मोंखोर हिच्याशी होणार आहे.

तर महिलांच्या 54 किलो गटात प्रीती पवार हिने दिवसातील सर्वात दमदार कामगिरी करत मंगोलियाच्या मुंगुंतसेत्सेंग हिला 5-0 अशा एकतर्फी फरकाने हरवले. प्रीती आता उपांत्य फेरीत कोरियाच्या इम एजी हिच्याशी भिडणार आहे, जी पॅरिस 2024 ऑलिम्पिक आणि 2025 जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आहे.

मात्र पुरुषांच्या 70 किलो गटात भारताला धक्का बसला. दीपक याला जॉर्डनच्या जियाद एशाशविरुद्ध 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला आणि तो उपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेबाहेर झाला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande