ठाणे पूर्वेत पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन; सर्वसामान्यांसाठी नवे क्रीडांगण खुले
ठाणे, 03 एप्रिल, (हिं.स.)। शहरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल या खेळाला चालना देण्यासाठी ठाणे पूर्व भागात नव्याने उभारण्यात आलेल्या पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या
ठाणे


ठाणे, 03 एप्रिल, (हिं.स.)। शहरात झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या पिकल बॉल या खेळाला चालना देण्यासाठी ठाणे पूर्व भागात नव्याने उभारण्यात आलेल्या पिकल बॉल कोर्टचे भव्य उद्घाटन आमदार संजय केळकर आणि कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या हस्ते पार पडले. पीपल एज्युकेशन सोसायटी आणि द्रोणाचार्य क्रीडा अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

ठाण्यात यापूर्वी काही खाजगी पिकल बॉल कोर्ट उपलब्ध असले, तरी सर्वसामान्य खेळाडूंना सहज उपलब्ध होईल असे हे पहिलेच महत्त्वाचे कोर्ट मानले जात आहे. ठाणे पिकल बॉल असोसिएशनच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या या उपक्रमामुळे खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणार आहेत.

उद्घाटन सोहळ्याला क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. पीपल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विद्याधर वैशंपायन, सचिव आल्हाद जोशी, ठाणे पिकल बॉल असोसिएशनचे अध्यक्ष मनोहर डुंबरे, सचिव सचिन मोरे, अ‍ॅड. सुभाष काळे, संस्थेचे संचालक श्री. भोळे, श्री. तुरुकमाने तसेच सौ. मेधा भंडारी यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या नव्या कोर्टमुळे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पिकल बॉलसारख्या आधुनिक खेळात प्राविण्य मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. भविष्यात अधिकाधिक युवा या खेळाकडे वळतील आणि व्यावसायिक स्तरावर संधी निर्माण होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.

आमदार संजय केळकर आणि निरंजन डावखरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, खेळाडूंना आवश्यक त्या सर्व सुविधा आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या नव्या क्रीडा सुविधेमुळे ठाणे पूर्व भागातील क्रीडा संस्कृतीला नवी उभारी मिळणार असल्याचे चित्र आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande