
मुंबई, 03 एप्रिल (हिं.स.)। जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी तीन वर्षांनी लोकसभा निवडणूक असल्याने खासदारकीचे उमेदवार आतापासून ठरवत संघटनेची बांधणी केली पाहिजे, असा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. घराबाहेर न पडणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना राऊत यांनी घरचा आहेर दिला आहे. राऊत यांनी एकप्रकारे पक्षनेतृत्वाची निर्भत्सनाच केल्याची बोचरी टीका भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शुक्रवारी केली. उद्धव ठाकरेंना असा सल्ला देण्याची संजय राऊत यांची पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी शरद पवार हे या वयातही राज्यात फिरायला तयार असल्याचे ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. आताच्या त्यांच्या सल्ल्यामुळे उबाठा गटात असलेली दुफळी चव्हाट्यावर आल्याचे बन म्हणाले.
महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून निर्णय घेतला पाहिजे असे संजय राऊत म्हणत आहेत. मात्र, काँग्रेस पक्ष परस्पर राहुरी आणि बारामतीचे उमेदवार जाहीर करते यावरून त्यांचा समन्वय दिसून आला आहे. महाविकास आघाडीच्या पार ठिकऱ्या उडाल्या आहेत. तिन्ही पक्षांची तोंडे तीन दिशेला आहेत. मीठ उबाठाचे खायचे आणि प्रवक्तेगिरी शरद पवार यांची करायची हा संजय राऊत यांचा धंदा सुरु असल्याची टीका श्री. बन यांनी केली.
अवकाळी पावसाबद्दल बोलताना संजय राऊत यांच्या तोंडून आधी शेतकऱ्यांप्रती सरकार संवेदनशील असल्याचे खरे वाक्य आले. नंतर सारवासारव करत ते सरकार असंवेदनशील असल्याचे म्हणाले. महाविकास आघाडीचे असंवेदनशील होते. बांधावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना 25 हजार देऊ, 50 हजार देऊ अशी आश्वासने दिली. प्रत्यक्षात दमडीही दिली नाही असे बन यांनी नमूद केले.
आताच्या अवकाळी पावसात प्रामुख्याने नुकसान झालेल्या केळीबागांचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले. राज्यात कोणतीही निवडणूक नसताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी देण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केल्याचे श्री. बन यांनी निदर्शनास आणले.
संकटमोचक हे रस्त्यावर उतरतात, बांधावर जातात. उद्धव ठाकरे जळगावात येऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत का? आदित्य ठाकरे मराठवाड्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे सांत्वन करणार आहेत का असे सवाल करीत बन यांनी मागच्यावेळी नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेलेले संजय राऊत मर्सिडीजमध्ये बसून काजू बदाम खात बसले होते याची आठवणकरून दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर