
- आरडीसीएच्या पुढाकारातून मुंबईत दर्जेदार क्रिकेटचा अनुभव
रायगड, 30 एप्रिल (हिं.स.)। जिल्ह्यातील युवा क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळावी यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए)च्या पुढाकारातून मुंबईतील सुप्रसिद्ध ब्रेबॉन स्टेडियमवर १६ वर्षांखालील खेळाडूंसाठी एकदिवसीय सामन्याचे आयोजन करण्यात आले. हा सामना रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघ आणि सीसीआय क्रिकेट अकॅडमी यांच्यात रंगला.
आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील खेळाडूंना उच्च दर्जाच्या क्रिकेटची संधी मिळावी यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन वर्षांत विविध वयोगटातील खेळाडूंसाठी जिल्ह्यात विविध मैदानांवर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, आता मुंबई व पुणे येथेही खेळण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
“जिल्ह्याबाहेर खेळण्याचा अनुभव मिळाल्यास खेळाडूंचा आत्मविश्वास आणि कौशल्य अधिक विकसित होते,” असे मत अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी व्यक्त केले. या उपक्रमामुळे युवा खेळाडूंना उत्कृष्ट खेळपट्टी व मैदानाचा अनुभव मिळाला. सीसीआयच्या कार्यकारी मंडळाने रायगडच्या खेळाडूंना ही संधी दिल्याबद्दल आरडीसीएच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच जिल्ह्यात लेदर बॉल क्रिकेटचा प्रसार व्हावा यासाठी प्रीमियर लीगसारख्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात येत आहे.
मुंबईतील ब्रेबॉन स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल खेळाडू व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, भविष्यात अशा प्रकारचे सामने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्याचे आश्वासन आरडीसीएकडून देण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)