
माद्रिद, ३० एप्रिल, (हिं.स.). ॲटलेटिको माद्रिद आणि आर्सेनल यांच्यातील UEFA चॅम्पियन्स लीग २०२६ उपांत्य फेरीचा पहिला सामना १-१ ने बरोबरीत सुटला. सामना रणनीतिकदृष्ट्या चुरशीचा झाला असला तरी, गोल करण्याच्या संधी मर्यादित होत्या.
पहिल्या हाफमध्ये आर्सेनलने आघाडी घेतली. ४४ व्या मिनिटाला व्हिक्टर ग्योकेरेस याला पेनल्टी मिळाली, जी त्याने उत्कृष्टपणे गोलमध्ये रूपांतरित करून संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या हाफमध्ये ॲटलेटिको माद्रिदने जोरदार पुनरागमन केले. ५६ व्या मिनिटाला, व्हिडिओ असिस्टंट रेफरीने (VAR) बेन व्हाईटचा हँडबॉल ठरवला, ज्यानंतर ज्युलियन अल्वारेझने पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करून स्कोअर १-१ असा बरोबरीत आणला.
त्यानंतर दोन्ही संघांनी संधी निर्माण केल्या, परंतु कोणालाही आघाडी घेता आली नाही. ॲटलेटिकोच्या अँटोइन ग्रीझमनचा शॉट क्रॉसबारला लागला, तर आर्सेनलला मिळालेली आणखी एक पेनल्टीची संधी VAR रिव्ह्यूनंतर रद्द करण्यात आली.
सामन्यानंतर, ऍटलेटिको माद्रिदचा कर्णधार कोके म्हणाला, आम्ही आमचा सर्वोत्तम प्रयत्न केला. पहिला गोल पेनल्टीमधून झाला, जो मला थोडा आक्षेपार्ह वाटला. आमच्याकडे सामना जिंकण्याची संधी होती, पण आता निर्णय दुसऱ्या लेगमध्ये घेतला जाईल. त्यांचा बचाव मजबूत आहे आणि त्यांचे आघाडीचे फुटबॉलपटू खूप वेगवान आहेत. आम्ही आमच्या संधींचे सोने करू शकलो नाही. आम्हाला आशा आहे की लंडनमधील पुढचा सामना या हंगामातील आमचा शेवटचा सामना नसेल.
आर्सेनलचा गोल करणारा फुटबॉलपटू व्हिक्टर ग्योकेरेस म्हणाला, पहिल्या हाफमध्ये सामन्यावर आमचे चांगले नियंत्रण होते. दुसऱ्या हाफमध्ये ते अधिक चांगला खेळले आणि कदाचित ते गोलसाठी पात्र होते. एकूणच, हा एक कठीण सामना होता. घरच्या मैदानावर आणि प्रेक्षकांच्या जोरदार पाठिंब्यामुळे पुढचा सामना वेगळा असेल. आम्हाला आमचा सर्वोत्तम खेळ करावा लागेल.
आता दोन्ही संघांमधील दुसरा लेग ५ मे रोजी लंडनमध्ये खेळला जाईल. या सामन्याचा विजेता अंतिम फेरीत पॅरिस सेंट-जर्मेन किंवा बायर्न म्युनिच यांच्यापैकी एकाचा सामना करेल. सध्या पहिल्या लेगमध्ये पीएसजी ५-४ ने आघाडीवर आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे