देवळालीत अतिक्रमणावरून नगरसेवकांमध्ये राडा; अतिक्रमण पथक मागे हटले
नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.) : देवळाली गाव परिसरात अनेक वर्षांपासून भरत असलेल्या सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सुराणा चौक येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपा नगरसेविका
देवळालीत अतिक्रमणावरून नगरसेवकांमध्ये राडा; अतिक्रमण पथक मागे हटले


नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.) : देवळाली गाव परिसरात अनेक वर्षांपासून भरत असलेल्या सोमवार आठवडे बाजाराच्या अतिक्रमणावरून सुराणा चौक येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शिंदे सेनेचे माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे आणि प्रभाग क्रमांक 21 मधील भाजपा नगरसेविका श्वेता भंडारी यांचे पती निर्मल भंडारी यांच्यात रस्त्यावर वाद होऊन प्रचंड राडा व शिवीगाळ झाली.

या प्रकारामुळे अतिक्रमण पथकाला अखेर कारवाई न करता माघारी जावे लागले. देवळालीचा सोमवार बाजार नाशिक रोडसह पंचक्रोशीतील शेतकरी, महिला भाजी विक्रेते आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह या बाजारावर अवलंबून आहे.

वाढती लोकसंख्या आणि बाजारातील ग्राहक व विक्रेते यामुळे बाजाराचा विस्तार दत्त मंदिर रोड ते आर्टिलरी सेंटर रोड तसेच महात्मा गांधी पुतळा ते साठे नगरपर्यंत झाला आहे. सोमवारी सायंकाळी सुराणा चौक परिसरातील अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमण पथकासह निर्मल भंडारी घटनास्थळी दाखल झाले. काही भाजी विक्रेते व महिला विक्रेत्यांचा माल हटवण्यास सुरुवात झाली.

ही कारवाई सुरू असल्याचे पाहून माजी नगरसेवक सूर्यकांत लवटे घटनास्थळी पोहोचले आणि कारवाईबाबत विचारणा केली. या वेळी दोघांमध्ये वाद झाला व रस्त्यावर राडा व शिवीगाळ झाली.

सूर्यकांत लवटे यांनी सांगितले की, “सोमवार बाजारामुळे अनेक गरीब शेतकरी व महिला विक्रेत्यांचा उदरनिर्वाह चालतो, नागरिकांनी सहकार्य करावे.” तर निर्मल भंडारी यांनी सांगितले की, “सुराणा चौकात वाहतुकीस अडथळा येत आहे. येथे चार ते पाच हॉस्पिटल आहेत, रुग्णवाहिकांना मार्ग मिळत नाही. त्यामुळे अतिक्रमण हटवणे गरजेचे आहे.”

--------------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande