
मालमत्तांची चौकशी सुरू ; संपत्तीवर टाच येण्याची शक्यता
नाशिक, 06 एप्रिल (हिं.स.)।अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भोंदू अशोक खरात यांच्यावर सोमवारी ( दि. ६) गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केल्याची माहिती आहे. या प्रकरणी अशोक खरात यांच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्यांच्या बँक खात्यांची सखोल माहिती घेतली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची ईडी मार्फत चौकशी होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कारवाई झाली.
अशोक खरात व त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्यासह पाच जणांविरोधात शिर्डीत बेकायदा सावकारकी व जमीन व्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अशोक खरात यांच्या आर्थिक व्यवहारांसह मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहारही तपास यंत्रणांच्या रडारवर आले आहेत.
या प्रकरणी विशेष तपास पथकाने शिर्डी नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व माजी नगरसेवकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. यामुळे खरात यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे. या प्रकरणामुळे खरात यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे.अशोक खरात यांच्यावर अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी ८ गुन्हे हे महिलांचे लैंगिक शोषण, फसवणूक व जादूटोणा यांसंदर्भात आहेत, तर उर्वरित ४ गुन्हे आर्थिक फसवणुकीशी संबंधित आहेत. त्यात आता ईडीने दाखल केलेल्या मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्याची भर पडली आहे.ईडीने प्रस्तुत प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहारांप्रकरणी नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे ईसीआयआर दाखल केला आहे. त्यानुसार, पोलिसांनी जमा केलेली सर्व महत्त्वाची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत.
बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू
ईडीने गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरू केला असून, खरात यांच्या बेहिशोबी मालमत्तांसह त्यांच्या बँक खात्यांची सखोल चौकशी केली जात आहे. तपासानंतर त्यांच्या मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV