
लातूर, 06 एप्रिल (हिं.स.) : लातूर शहरात दरवर्षी मान्सूनदरम्यान उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्येच्या पार्श्वभूमीवर, यंदाच्या मान्सूनपूर्व नालेसफाई आणि स्वच्छता मोहिमेत शहरालगतच्या वाड्या-वस्त्यांचा प्राधान्याने समावेश करावा, अशी मागणी लातूर शहर पूर्व भाग नागरी हक्क कृती समितीने महापौरांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
समितीच्या निवेदनानुसार, गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक नाले तुंबले होते. परिणामी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरातही पाणी शिरले होते. विशेषतः पूर्व भागातील महादेव नगर, करीम नगर, प्रबुद्ध नगर, महाडा कॉलनी, वैशाली नगर, बाभळगाव नाका परिसर, वैभव सोसायटी, मोहन नगर, गवळी नगर, एस.ओ.एस. बालग्राम, जय नगर, न्यू जय नगर, डॉ. अब्दुल कलाम नगर, बुऱ्हाण नगर, मळवटी रोड, सिद्धेश्वर नगर तसेच जुना गाव परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर, स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी त्या वेळी घटनास्थळी भेट देऊन संबंधित भागांचा मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेत समावेश करण्याचे तोंडी निर्देश दिले होते. तसेच शहरालगतच्या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही दिले होते. मात्र, या आश्वासनांची अद्याप प्रभावी अंमलबजावणी झालेली नसल्याचे समितीने नमूद केले आहे.
त्यामुळे विद्यमान महापौरांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी समितीकडून करण्यात आली आहे. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष दीपक गंगणे, सचिव बाबासाहेब बनसोडे तसेच पत्रकार नितीन चालक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis