

- शरद पवारांची 59 वर्षांची प्रदीर्घ संसदीय कारकीर्द
नवी दिल्ली, 06 एप्रिल (हिं.स.)। राज्यसभेत महाराष्ट्रातील 5 सदस्यांसह १९ सदस्यांचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. राज्यसभा अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. यावेळी उपसभापती हरिवंश तसेच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू हेही उपस्थित होते.
या शपथविधीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या 59 वर्षांच्या प्रदीर्घ आणि यशस्वी संसदीय कारकिर्दीचा टप्पा गाठल्यानंतर तिसऱ्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी व्हीलचेअरवर बसूनच ही शपथ ग्रहण केली. ज्यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले गेले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, ज्योती नागनाथ वाघमारे या सावित्रीबाई फुले यांच्या वेशात शपथ घेण्यासाठी आल्या होत्या, त्यामुळे सोहळ्याला एक वेगळे सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
नवनिर्वाचित सदस्यांमध्ये महाराष्ट्रातील पाच, तामिळनाडूतील सहा, पश्चिम बंगालमधील पाच आणि ओडिशामधील तीन सदस्यांचा समावेश होता. महाराष्ट्रातून भाजपच्या माया चिंतामण इवनाते यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यानंतर शरद पवार यांनी शपथ घेतली. याशिवाय रामराव सखाराम वडकुटे, ज्योती नागनाथ वाघमारे आणि रामदास आठवले यांनीही राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सदस्यत्वाची शपथ घेतली.
ओडिशामधून मनमोहन सामल, समृद्ध मिश्रा आणि दिलीप कुमार राय यांनी सदस्य म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूमधून कॉन्स्टन्टाईन रविंद्रन, क्रिस्टोफर मणिकम, एल. के. सुधीश, एम. थंबीदुराई, तिरुची शिवा आणि अंबुमणी रामदास यांनी राज्यसभेतील सदस्यत्व स्वीकारले. पश्चिम बंगालमधून बाबुल सुप्रियो बराल, बिस्वजीत सिन्हा, मेनका गुरुस्वामी, राजीव कुमार आणि रुक्मिणी मलिक यांनी शपथ घेतली.
या शपथविधी सोहळ्यात बहुतेक सदस्यांनी आपापल्या प्रादेशिक भाषांमध्ये शपथ घेतली, ज्यामुळे देशाच्या विविधतेचे दर्शन घडले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आणि नव्या सदस्यांच्या आगमनामुळे राज्यसभेच्या कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याचे मानले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule