आदिवासी मुलांसाठी रायगड पोलिसांची विशेष कार्यशाळा
रायगड, 06 एप्रिल (हिं.स.)। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक ८ एप्रिल २०
आदिवासी मुलांसाठी रायगड पोलिसांची विशेष कार्यशाळा


रायगड, 06 एप्रिल (हिं.स.)। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि समाजातील महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करण्याच्या उद्देशाने रायगड जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडणार आहे.

या कार्यशाळेत शिक्षण, करिअर मार्गदर्शन, बालविवाह प्रतिबंध, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आदिवासी मुलांना योग्य दिशा देण्यासाठी आणि त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित राहणार असून, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजीत शिवतरे, उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत राहुल गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक नेरळ राहुल वरोटे तसेच भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक स्मिता पाटील हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

ही कार्यशाळा मधुरम चारिटेबल ट्रस्ट संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा, माणगाव वाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड येथे आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात परिसरातील नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande