एकाही कामगारावर अन्याय सहन केला जाणार नाही – आ. साजिद खान पठाण
अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील एकाही कामगारावर अन्याय होऊ नये, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कामगारापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे कडक निर्देश कामगार कल्याण संनियंत्रण समितीचे अध्यक्
Photo


अकोला, 07 एप्रिल (हिं.स.)। अकोला जिल्ह्यातील एकाही कामगारावर अन्याय होऊ नये, तसेच शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र कामगारापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे, असे कडक निर्देश कामगार कल्याण संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिले.

मंगळवारी दुपारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित कामगार कल्याण संनियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत समितीच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीदरम्यान काही सदस्यांनी बोगस कामगार नोंदणीचा मुद्दा उपस्थित केला. काही अपात्र व्यक्ती कामगार म्हणून नोंदणी करून शासनाच्या योजनांचा लाभ घेत असल्याची बाब समोर आली. यावर आ. पठाण यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, “यापुढे कोणत्याही परिस्थितीत बोगस नोंदणी होऊ देऊ नका. पात्र कामगारच योजनांचा लाभ घेतील याची खात्री करा,” असे स्पष्ट निर्देश दिले.

तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचेही त्यांनी सांगितले. अनेक कामगार माहितीअभावी योजनांपासून वंचित राहतात, त्यामुळे समितीने जनजागृतीवर भर देऊन गावपातळीपर्यंत माहिती पोहोचवावी, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, समितीच्या कामकाजात पारदर्शकता राखण्यासाठी दर महिन्याला कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. समितीने सक्रियपणे काम करून कामगारांच्या अडचणी सोडवाव्यात, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला समितीचे सचिव महेंद्र जाधव, सदस्य सुनील वानखेडे, प्रशांत मेश्राम, मो. तौसीफ मो. मुनाफ, अब्दुल जमीर अब्दुल जहीर, शकिलाबी राजिक खान, विशाखा कांबळे, मोहम्मद इरफान, मोहम्मद युसुफ, नोंदणी अधिकारी किरण राठोड, विनोद जोशी, अमर खेतकेडे, दिनेश गोंडचवर, ज्ञानेश्वर केदारे, प्रशांत सराग, लोकेश पराते, आयुष चतरकर, गौरव झांबरे यांच्यासह समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कामगारांच्या हक्कांसाठी समितीची जबाबदारी अधिक प्रभावीपणे पार पाडली जाईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande