उदगीरमध्ये बँक खात्यातून ६.५६ लाखांची फसवणूक
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)। आर्थिक व्यवहाराच्या नावाखाली विश्वास संपादन करून लाखोंची फसवणूक केल्याची घटना उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी साडेसहा लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यातून परस्पर घेऊन आरोपीने फिर्यादीची आर्थ
आर्थिक फसवणूक


लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)।

आर्थिक व्यवहाराच्या नावाखाली विश्वास संपादन करून लाखोंची फसवणूक केल्याची घटना उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी साडेसहा लाखांहून अधिक रक्कम बँक खात्यातून परस्पर घेऊन आरोपीने फिर्यादीची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, असिफ युनुस शेख (रा. शास्त्रीनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाँद अहमदसाब शेख (रा. अंजलीनगर, लातूर) याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपीने फिर्यादीशी ओळख वाढवत विश्वास संपादन केला आणि फायनान्स संबंधित कामाच्या निमित्ताने आपल्या खात्यावर पैसे पाठवण्यास भाग पाडले. फिर्यादीने विश्वास ठेवून टप्प्याटप्याने एकूण ६ लाख ५६ हजार ३८९ रुपये आरोपीच्या खात्यावर वर्ग केले. मात्र, नंतर ही रक्कम परत मागितली असता आरोपीने उडवाउडवीची उत्तरे देत शिवीगाळ केली आणि धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून, आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार तुडमे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande