
नवी दिल्ली , 08 एप्रिल (हिं.स.)।अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे कूटनीतिक तोडगा निघण्याचा मार्ग खुला झाल्याचे दिसत आहे. या युद्धविरामावर भारताकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात या युद्धविरामाचे स्वागत करण्यात आले आहे.
मंत्रालयाने म्हटले आहे, “आम्ही या युद्धविरामाचे स्वागत करतो आणि यामुळे पश्चिम आशियात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होईल, अशी आशा व्यक्त करतो. यापूर्वीही आम्ही अनेकदा सांगितल्याप्रमाणे, सध्याचा संघर्ष लवकरात लवकर संपवण्यासाठी तणाव कमी करणे, संवाद आणि कूटनीती अत्यावश्यक आहेत.”
भारताने पुढे म्हटले आहे, “या संघर्षामुळे सामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असून जागतिक ऊर्जा पुरवठा आणि व्यापार नेटवर्कवरही परिणाम झाला आहे. होर्मुज सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक सुरळीत सुरू राहावी आणि जागतिक व्यापाराचा प्रवाह अबाधित राहावा, अशी आम्हाला आशा आहे.” उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम आशियात गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरू असलेल्या इराण युद्धामुळे जगभर ऊर्जा संकट अधिक तीव्र झाले होते.
दरम्यान, तेहरानमधील भारतीय दूतावासाने सध्याची परिस्थिती लक्षात घेता भारतीय नागरिकांना तात्काळ देश सोडण्याचा सल्ला दिला आहे. यापूर्वी ७ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या सल्ल्यात नागरिकांना सतर्क राहून सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. दूतावासाने भारतीय नागरिकांना दूतावासाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात राहण्याचे आणि त्यांनी सुचवलेल्या सुरक्षित मार्गांचा वापर करूनच इराणमधून बाहेर पडण्याचे निर्देश दिले आहेत.
तसेच, कोणत्याही भारतीय नागरिकाने दूतावासाचा सल्ला न घेता कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीमेकडे जाण्याचा प्रयत्न करू नये, अशी कडक सूचना देण्यात आली आहे. कोणत्याही सीमेकडे जाण्यापूर्वी दूतावासाशी समन्वय साधणे अनिवार्य असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode