
पुणे, 08 एप्रिल (हिं.स.)। पुण्यातील एका सामाजिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले चर्चेत आले आहेत. अवैध धंद्यांवर कारवाईचे आश्वासन देताना त्यांनी “भाईला बाई करू” असे अजब वक्तव्य केल्याने उपस्थितांमध्ये काही काळ गोंधळ निर्माण झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील परिमंडळ १ चे उपआयुक्त कृषीकेश रावले हे एका सामाजिक कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ते शहरातील अवैध धंदे, गुन्हेगारी आणि अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांबाबत बोलत होते.
अवैध धंदे करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देताना त्यांनी “हा भाई, तो भाई… सगळ्या भाईला बाई करू आपण” असे वक्तव्य केले. मात्र, लगेचच स्वतःची चूक लक्षात येताच त्यांनी ते सावरत स्पष्ट केले की, महिलांबद्दल काहीही अपमानास्पद बोलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांनी आपले म्हणणे स्पष्ट करत सांगितले की, “महिलांबद्दल मी तसे बोलत नाहीये, पण गुन्हेगारांना ‘भाई’ म्हणून संबोधले जाते, त्याच संदर्भात ते वक्तव्य झाले.” दरम्यान, या कार्यक्रमात त्यांनी अमली पदार्थांच्या विळख्यात अडकलेल्या तरुणांची सुटका करण्यावरही भर दिला. अशा व्यक्तींना व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करून त्यांचे समुपदेशन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु