अंकिता आणि पल्लवी जाधव यांची पोलीस दलात ऐतिहासिक कामगिरी
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)। : शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर परिस्थिती कधीच अडथळा ठरू शकत नाही, हे अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील अंकिता बाबुराव जाधव आणि पल्लवी विजय जाधव या दोन सख्ख्या चुलत बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे
पोलीस भरती


लातूर, 09 एप्रिल (हिं.स.)।

: शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द असेल तर परिस्थिती कधीच अडथळा ठरू शकत नाही, हे अहमदपूर तालुक्यातील सुनेगाव शेंद्री येथील अंकिता बाबुराव जाधव आणि पल्लवी विजय जाधव या दोन सख्ख्या चुलत बहिणींनी सिद्ध करून दाखवले आहे. दोन दिवसांपूर्वी अंकिताने पुणे पोलीस दलात एसईबीसी प्रवर्गातून १३२ गुण मिळवून मिळवलेल्या यशानंतर आणि त्यापूर्वी महिनाभरापूर्वी पल्लवीने नांदेड पोलीस दलात मिळवलेल्या यशामुळे एकाच घरातील दोन कन्यांनी खाकी वर्दी परिधान करून गावचे नाव राज्यस्तरावर चमकवले आहे.

नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार, अंकिता बाबुराव जाधव हिने पुणे पोलीस भरतीत १३२ गुणांची मोठी कमाई करत यश संपादन केले, तर महिनाभरापूर्वी झालेल्या नांदेड पोलीस भरतीमध्ये पल्लवी विजय जाधव हिने एसईबीसी प्रवर्गातून १२९ गुण मिळवून मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावण्याचा मान मिळवला होता.

दोन्ही भगिनींचा हा प्रवास अत्यंत खडतर आणि प्रेरणादायी राहिला आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना आणि वडिलांकडे जेमतेम शेती असूनही त्यांनी आपल्या ध्येयापासून मागे न सरकता हे यश खेचून आणले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही महागड्या क्लासचा किंवा वाचनालयाचा (रीडिंग) आधार न घेता, या दोन्ही मुलींनी घरच्या घरी राहूनच अत्यंत चिकाटीने अभ्यास केला. त्यांच्या या यशात महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर येथील प्राध्यापक विनोद माने यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, त्यांनी दोन्ही मुलींची मैदानी चाचणी व लेखी परीक्षेची शास्त्रोक्त पद्धतीने तयारी करून घेतली होती.

अंकिता जाधव हिने तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा सुनेगाव शेंद्री येथे पूर्ण केले, तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालय व महाविद्यालयातून घेतले. त्यानंतर तिने शिवलिंग शिवाचार्य महाराज आयटीआय कॉलेजमधून इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमा पूर्ण केला. दुसरीकडे पल्लवीने महिनाभरापूर्वीच नांदेड पोलीस भरतीत १२९ गुणांसह गुणवत्ता यादीत अव्वल स्थान मिळवून गावची पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळवला होता. पल्लवी पाठोपाठ आता अंकिताचीही दोन दिवसांपूर्वी १३२ गुणांसह पुणे पोलीस दलात निवड झाल्याने सुनेगाव शेंद्री गावाला दोन रणरागिणी मिळाल्या आहेत.

या दोन्ही शेतकरी कन्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण अहमदपूर तालुक्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या इतर मुलींसाठी जाधव भगिनी आता एक नवा आदर्श ठरल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande