
जळगाव, 09 एप्रिल (हिं.स.) शहरातील अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत प्रशासनाकडून भेदभाव केला जात असल्याचा गंभीर आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जळगाव महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या मार्गावरील परप्रांतीय अतिक्रमणांवर मेहेरबानी आणि स्थानिक मराठी तरुणांवर कारवाई, या ‘दुहेरी’ नीतीचा मनसेने जोरदार निषेध केला आहे. मनसेच्या शिष्टमंडळाने आज महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. खोटे नगर ते कालिका माता मंदिर या मुख्य रस्त्यावर अनेक परप्रांतीय व्यापाऱ्यांनी बेकायदेशीरपणे रस्ते अडवून दुकाने थाटली आहेत. मात्र, अतिक्रमण विभाग त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. याउलट, पोटाची खळगी भरण्यासाठी छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्या स्थानिक मराठी तरुणांच्या टपऱ्या आणि गाड्यांवर मात्र तातडीने कारवाई केली जाते, असा आरोप मनसेने केला आहे. केवळ कारवाई न करता शहरात ‘हॉकर्स झोन’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे. नियोजित हॉकर्स झोन तातडीने निश्चित करावेत.
लघु व्यावसायिकांना मूलभूत सुविधा व कायदेशीर संरक्षण मिळावे. स्थानिक मराठी तरुणांसाठी स्वतंत्र व सुसज्ज हॉकर्स झोनची निर्मिती करावी. ”प्रशासनाने सर्व अतिक्रमणांचे समान निकषांवर पुनरावलोकन करावे. परप्रांतीय व्यापाऱ्यांचे बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटवले गेले पाहिजे. जर स्थानिक मराठी हॉकर्सवर अन्याय झाला, तर मनसे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.” प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. गरज पडल्यास जनतेच्या सहकार्याने मनसे स्वतः रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याचे काम हाती घेईल, असा थेट इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, चेतन पवार, प्रकाश जोशी, आशुतोष जाधव यांच्यासह महिला सेनेच्या अनिता कापुरे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते व अन्यायग्रस्त मराठी हॉकर्स उपस्थित होते. जळगावातील हॉकर्सचा प्रश्न आता चिघळण्याची शक्यता असून, मनसेच्या या पवित्र्यामुळे महानगरपालिका प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर