
नवी दिल्ली, 09 एप्रिल (हिं.स.) : देशाच्या आसाम, केरळ आणि पुडुचेरी येथे आज, गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाले. या तिन्ही राज्यांमध्ये संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विक्रमी मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
निवडणूक आयोगाच्या रात्री 8 वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार आसाममध्ये तब्बल 85.38 टक्के मतदान झाले असून राज्याच्या इतिहासातील ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी ठरली आहे. केरळमध्ये मागील 49 वर्षांतील दुसऱ्या क्रमांकाचे उच्च मतदान नोंदवले गेले असून, येथे 78.01 टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यापूर्वी 1977 साली केरळमध्ये 79.2 टक्के मतदान झाले होते. पुडुचेरीमध्ये सर्वाधिक म्हणजेच 89.81 टक्के मतदान झाले. दरम्यान, असममध्ये निवडणूक प्रक्रियेदरम्यान हिंसाचाराच्या काही घटना घडल्या. सुमारे 30 जण जखमी झाले असून 7 जणांना अटक करण्यात आली आहे. श्रीभूमी जिल्ह्यातील पथारकांडी येथे काँग्रेस आणि भाजप समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत सुमारे 25 जण जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले.
पुडुचेरीचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी हे मतदानासाठी दुचाकीवरून मतदान केंद्रावर पोहोचले होते. केरळमध्ये माजी संरक्षण मंत्री आणि काँग्रेस नेते ए. के. अँटनी यांनी तिरुवनंतपुरम येथे मतदान केले. तसेच, असमचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात पूजा केल्यानंतर पत्नीसमवेत जालुकबारी येथे मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक लढतीबाबत बोलायचे झाल्यास, असममध्ये 126 जागांसाठी 41 पक्षांचे 722 उमेदवार रिंगणात आहेत. केरळमध्ये 1,7 कोटी मतदार 890 उमेदवारांमधून आपला प्रतिनिधी निवडणार असून येथे विधानसभेच्या 140 जागा आहेत. तर पुडुचेरीमध्ये 30 जागांसाठी मतदान झाले.
काही ठिकाणी मतदान प्रक्रियेत अडथळेही निर्माण झाले. असमच्या श्रीभूमी जिल्ह्यातील पथारकांडी येथे काँग्रेस उमेदवाराने ईव्हीएम मशीन फोडल्याने सुमारे तीन तास मतदान थांबले होते. नंतर नवीन मशीन बसवल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. केरळमधील कन्नूर येथे मतदान संपल्यानंतरही अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी कन्नूरमध्ये मतदान केले, तर केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार सुरेश गोपी यांनी त्रिशूर येथे मतदानाचा हक्क बजावला.पुडुचेरीमध्ये मतदान केंद्रावर मतदारांचे स्वागत करण्यासाठी रोबोटचीही व्यवस्था करण्यात आली होती, ज्यामुळे मतदारांमध्ये उत्सुकता दिसून आली.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी