
लातूर, 09 एप्रिल (हिं.स.) राज्यात काँग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी सुरू असलेल्या 'संघटन सृजन' अभियानांतर्गत लातूर येथील काँग्रेस भवनमध्ये जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तथा चंदीगड प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष एच.एस. लकी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या बांधणीचा आढावा घेताना एच.एस. लकी यांनी प्रत्येक पदाधिकाऱ्याशी व्यक्तिगत चर्चा केली. त्यांच्या कामातील अडचणी आणि संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांची मते त्यांनी जाणून घेतली.
यावेळी मार्गदर्शन करताना एच.एस. लकी म्हणाले की, काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून, आगामी काळात संघटनात्मक बदलांच्या माध्यमातून निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल. लातूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून, इथल्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर पक्षाला मोठे यश मिळाले आहे.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा काँग्रेसचे प्रभारी बाळासाहेब देशमुख यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी जिल्ह्यातील आगामी राजकीय आव्हाने आणि त्यादृष्टीने करावयाची तयारी यावर भाष्य केले.
बैठकीत जिल्हाध्यक्ष अभय साळुंके आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण जाधव यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या अभियानाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis