रत्नागिरी : आरवलीतील नारायण मंदिराचा १५० वा वर्धापनदिन उत्साहात
रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील माखजन दशक्रोशीतील आंबव-आरवली गावाच्या वेशीवर असलेल्या श्री देव आदित्य नारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवसांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला होता. माखजन दशक्रोशीतील आंबव-आरवली
रत्नागिरी : आरवलीतील नारायण मंदिराचा १५० वा वर्धापनदिन उत्साहात


रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । संगमेश्वर तालुक्यातील माखजन दशक्रोशीतील आंबव-आरवली गावाच्या वेशीवर असलेल्या श्री देव आदित्य नारायण मंदिराच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त पाच दिवसांचा विशेष महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

माखजन दशक्रोशीतील आंबव-आरवली गावाच्या वेशीवरून आदित्य नारायणाची मूर्ती सुमारे १९५ वर्षांपूर्वी एका तेलगू ब्राह्मणाने आरवली ब्राह्मणवाडीतील ग्रामस्थांना आणून सुपूर्द केली आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात एक छोटे केंबळी मंदिर बांधले. दशक्रोशीत माधुकरी मागून उपजीविका करणाऱ्या तेलंगी ब्राह्मणाच्या निधनाच्या पश्चात वैशाख शुद्ध पंचमी या दिवशी १८७६ मध्ये या गवताचे छप्पर असणाऱ्या मंदिराचा पहिल्यांदा जीर्णोद्धार होऊन पक्क्या बांधकामाचे मंदिर उभारण्यात आले. त्या वेळेपासून हा जीर्णोद्धाराचा दिवस दरवर्षी वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो.

मंदिरातील महोत्सवाचे औचित्य साधून अक्षय्य तृतीयेपासून धार्मिक विधींना सुरवात झाली. यामध्ये सौरआवर्तने, गणपती अथर्वशीर्षाची सहस्रावर्तने आणि धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेने वार्षिक उत्सवाला सुरवात झाली. गुरुप्रसाद कानिटकर यांनी 'छत्रपती शिवाजी - स्वराज्य ते साम्राज्य' या विषयावर प्रवचन दिले. श्रीनिवास पेंडसे यांनी 'भगवान परशुराम' या विषयावर विचार मांडले.

माजलगाव येथील युवा कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद पटवारी यांच्या कीर्तनाने सांगता झाली. प्रसिद्ध अभिनेते विघ्नेश जोशी आणि सहकाऱ्यांचा सांगीतिक कार्यक्रम या उत्सवाचे आकर्षण ठरला. युवा गायक ओंकार प्रभुघाटे आणि निधी घारे यांच्या गायनाने भक्तांना मंत्रमुग्ध केले. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी वाघांबे येथील परस्पर सहाय्यक मंडळाने 'संगीत जय जय गौरीशंकर' हे नाटक सादर केले. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (एआय) आणि जुन्या छायाचित्रांच्या माध्यमातून दीडशे वर्षांचा प्रवास दृक्श्राव्य स्वरूपात सादर करण्यात आला. यावेळी ७० वर्षांवरील ४५ ज्येष्ठ आदित्यभक्तांचा मंदिर व्यवस्थापनातर्फे सन्मान करण्यात आला. 'शतसुवर्णरमणी' ही ७४ पानांची रंगीत स्मरणिका ज्येष्ठ मंडळींच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली.

उत्सवादरम्यान महिलाभक्तांनी श्रींना ५६ भोग अर्पण केले. तसेच रात्री आकर्षक दीपोत्सव साजरा करण्यात आला. पालखी सोहळा, छबिना, फुगड्या आणि गोफ अशा पारंपरिक प्रकारांनी महोत्सवात मोठी रंगत आणली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande