
शिवसेनेत विलिनीकरणास जिल्हा शाखेचा विरोध
परभणी, १ मे (हिं.स.) : प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश करत पक्ष विलीन केल्याची घोषणा केली. मात्र या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील पक्ष संघटनेत तीव्र नाराजी पसरली आहे.
जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. मागील ८ ते १० वर्षांपासून पक्षासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचे यामुळे राजकीय नुकसान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली. बच्चू कडू यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कार्यकर्त्यांचा बळी दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रहार जनशक्ती पक्षाची परभणी जिल्हा शाखा शिवसेनेत विलीन होणार नाही आणि भविष्यात त्यांच्या सोबत काम करणार नाही, असा ठाम निर्णय जिल्हा कोअर कमिटीच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी दिली.
सावली येथील शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी झालेल्या बैठकीत पुढील राजकीय दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. येत्या दोन दिवसांत तालुका पातळीवर दौरे करून विविध पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल, असे ठरविण्यात आले.
या बैठकीस जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्यासह प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाचे जिल्हाप्रमुख केशव जाधव, जिल्हा चिटणीस रामेश्वर पुरी, जिल्हा उपाध्यक्ष रामेश्वर जाधव, उद्धव गरुड, संजय वाघमारे, नितीनकुमार वैराळ, धर्मेंद्र तूपसमुद्रे, मनोज माने यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
-------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis