डिजिटल युगात ग्रंथालयाकडे वळा; करिअरसाठी वाचन अनिवार्य — वंदना काटकर
लातूर, १ मे (हिं.स.) : डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे युवकांचा ग्रंथालयांकडील कल कमी होत असून अभ्यासाचा मौल्यवान वेळ मोबाईलवर खर्च होत आहे. उत्तम करिअर घडवण्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाशी नाते जोडणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रं
वंदना काटकर


लातूर, १ मे (हिं.स.) : डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे युवकांचा ग्रंथालयांकडील कल कमी होत असून अभ्यासाचा मौल्यवान वेळ मोबाईलवर खर्च होत आहे. उत्तम करिअर घडवण्यासाठी ग्रंथ आणि ग्रंथालयाशी नाते जोडणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालयाच्या ग्रंथपाल वंदना काटकर यांनी केले.

एमआयडीएसआर दंत महाविद्यालयात जागतिक पुस्तक व कॉपीराईट दिन निमित्त ग्रंथालय समिती व आयपीआर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास माईर एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संचालक प्रा. तेजस हनुमंत कराड, ओरल पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. वर्षा सांगळे, ग्रंथालय चेअरमन डॉ. महेश दडपे, तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य व मान्यवर उपस्थित होते.

काटकर यांनी सांगितले की, मोबाईल व सामाजिक माध्यमांमुळे माहिती सहज उपलब्ध होत असली तरी सखोल अभ्यास, चिंतन आणि विश्लेषणाची सवय कमी होत आहे. ग्रंथ वाचनातून मिळणारे ज्ञान अधिक व्यापक, टिकाऊ आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरते.

कॉपीराईट विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. वर्षा सांगळे यांनी त्याचे महत्त्व, नोंदणी प्रक्रिया आणि स्वतःचे लिखाण सुरक्षित ठेवण्याचे मार्ग स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात प्रा. तेजस कराड यांनी विद्यार्थ्यांनी लेखनाची सवय लावून त्याचे कॉपीराईट घेण्याचे आवाहन केले. तसेच संत ज्ञानेश्वर यांच्या ‘ज्ञानेश्वरी’चा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी चिरंतन कार्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात उत्कृष्ट ग्रंथालय उपयोगिता पारितोषिक शिक्षक गटातून डॉ. स्फूर्ती जोशी, पदव्युत्तर गटातून डॉ. अंजली वशिष्ठ आणि पदवीपूर्व गटातून आकांक्षा गिरी यांना प्रदान करण्यात आले. तसेच निबंध, कविता लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आझमी पेशीमाम यांनी केले. विविध महाविद्यालयांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande