
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदात संभाव्य बदलांसदर्भातील निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी सामूहिकपणे घेतील, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शुक्रवारी सांगितले. पक्षश्रेष्ठींमध्ये सोनिया गांधी, राहुल गांधी आणि स्वतः पक्षाध्यक्ष खर्गे यांचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमध्ये नेतृत्व बदलाच्या चर्चांना वेग आला असताना खर्गेयांनी स्पष्ट केले की सध्या सिद्धारमैयाच मुख्यमंत्री राहतील. मात्र, त्यांनी हेही नमूद केले की पक्षातील महत्त्वाचे निर्णय सामूहिकरित्या घेतले जातात. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर टीका करत राजकीय वाद निर्माण केला आहे. मुख्यमंत्री बदलाबाबत चर्चा वारंवार होत असते, परंतु अंतिम निर्णय काँग्रेस अध्यक्ष म्हणून ते स्वतः, सोनिया गांधी आणि राहुल गांधी मिळून घेतात. वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करूनच संघटनात्मक आणि राजकीय निर्णय घेतले जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.काँग्रेस पक्षश्रेष्ठींमध्ये सविस्तर चर्चेनंतरच निर्णय घेतला जातो, कोणताही निर्णय सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांच्या सहभागाशिवाय घेतला जात नसल्याचे खर्गे यांनी सांगितले. अद्याप कोणतीही तारीख निश्चित नसल्याने नेतृत्व बदलांचा अंदाज बांधणे घाईचे ठरेल असेही त्यांनी सांगितले.
कर्नाटकात नेतृत्व बदलाच्या कथित करारावरून अंतर्गत मतभेद सुरू आहेत. मुख्यमंत्री सिद्धारमैयांचे समर्थक आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये सत्ता-सामायिकरणावरून मतभेद दिसून येत आहेत. 2023 मधील कथित कराराचा उल्लेख करत काही गट शिवकुमार यांना उर्वरित कार्यकाळासाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत.
या घडामोडींमुळे राज्य सरकारमध्ये स्थिरता राखण्यासाठी सिद्धारमैया आणि डी. के. शिवकुमार यांच्यात अनेक चर्चांचे सत्र झाले आहे. दरम्यान, गृहमंत्री जी. परमेश्वर यांनाही कर्नाटक काँग्रेसमधील नेतृत्व समीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते मानले जात आहे.काँग्रेस पक्षश्रेष्ठी लवकरच कर्नाटकमधील नेतृत्वाबाबतचा निर्णय घेईल, जो मंत्रिमंडळ फेरबदल किंवा सिद्धारमैयांना कायम ठेवण्याच्या दिशेने असू शकतो असे खर्गे म्हणालेत.
------------------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis