

* निवासी आयुक्त आर. विमला यांच्या हस्ते आंबा महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन
नवी दिल्ली, 01 मे (हिं.स.) : दिल्लीच्या बाजारपेठेत अनेक प्रकारचे आंबे उपलब्ध असतात, मात्र तो आंबा अस्सल देवगड किंवा रत्नागिरीचाच आहे का, याची शाश्वती ग्राहकांना नसते. हीच अडचण ओळखून आम्ही कोकणातील 'जी.आय. टॅग' मानांकित अस्सल हापूस थेट दिल्लीकरांसाठी उपलब्ध करून दिला आहे,असे प्रतिपादन महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव श्रीमती आर. विमला यांनी केले.
महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे आयोजित करण्यात आलेल्या 'कोकण हापूस आंबा महोत्सवाचे' उद्घाटन आज त्यांच्या हस्ते संपन्न झाले, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) सुशील गायकवाड, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल,सहसंचालक, कृषी विभाग शिवाजी आमले , सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी अभियंता आशुतोष दिवेदी, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.
उद्घाटनानंतर महोत्सवातील स्टॉल्सची पाहणी करताना श्रीमती आर. विमला म्हणाल्या की, कोकणच्या मातीत पिकलेला अस्सल हापूस आंबा ग्राहकांना मिळेल, याची आम्ही पूर्ण खात्री केली आहे.ग्राहकांना अस्सल हापूसची चव यनिमित्ताने मिळणार आहे.
श्रीमती आर. विमला यांनी दिल्लीकरांच्या प्रतिसादाबद्दल समाधान व्यक्त केले. मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता, पुढच्या वर्षी हा महोत्सव अधिक व्यापक स्वरूपात आणि जास्त दिवसांसाठी आयोजित करण्याचा मानस असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी