
मुंबई, 01 मे (हिं.स.) : महाराष्ट्र दिनाच्या सुट्टीनंतर लागून आलेल्या वीकेंडमुळे मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर आज,शुक्रवारी पहाटेपासूनच प्रचंड वाहतूककोंडी निर्माण झाली. या कोंडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीय सुळे यांनाही बसला. खासदार सुळे सुमारे 3 तास वाहतूककोंडीत अडकून पडल्या होत्या, ज्यामुळे त्या महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन कार्यक्रमाला वेळेत पोहोचू शकल्या नाहीत.
सलग तीन दिवसांच्या सुट्ट्यांमुळे वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यातच एक्सप्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी काही ठिकाणी मार्ग वळवण्यात आल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली. परिणामी, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक ठप्प झाली, तर मुंबईकडे येणारी वाहतूक काही काळ थांबवून पुण्याकडील वाहने सोडण्यात आली. यामुळे दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या.दरम्यान, वाढत्या उन्हामुळे अनेक वाहनांची इंजिने गरम होऊन काही गाड्या बंद पडल्याच्या घटनाही घडल्या. घाट विभागात तीव्र चढ असल्याने ही समस्या अधिक तीव्र झाली. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळाले असून, वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी या वाहतूककोंडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. “आम्ही सकाळी सात वाजता ठाण्यावरून निघालो, मात्र दोन तासांहून अधिक वेळ आम्ही कोंडीत अडकलो आहोत,” असे त्यांनी सांगितले. त्यांच्या व्हिडिओमध्ये इतर प्रवाशांनीही वाहतूककोंडीमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली. दरम्यान दुपारी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्यानेच ही कोंडी निर्माण झाल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला आहे.
--------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी