संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरू नका, मराठीजनांना राज ठाकरेंचे भावनिक आवाहन
- हुतात्मा स्मारक परिसरावरून सरकारला देखील केले लक्ष्य मुंबई, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि भावनिक पोस्ट करत मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र
Raj Thackeray Emotional x Post Maharashtra Day


Raj Thackeray Emotional x Post Maharashtra Day


- हुतात्मा स्मारक परिसरावरून सरकारला देखील केले लक्ष्य

मुंबई, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक सविस्तर आणि भावनिक पोस्ट करत मराठी अस्मिता, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मुंबईच्या इतिहासाबाबत महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. मुंबईतील हुतात्मा चौक येथे जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिल्यानंतर त्यांनी ही भूमिका व्यक्त केली असून, महाराष्ट्र दिन साजरा करण्याबाबत राज्य सरकारच्या उदासीनतेवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये सुरुवातीला सर्वांना महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी दरवर्षीप्रमाणे हुतात्मा स्मारकाला भेट देत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांना अभिवादन केल्याचे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे नमूद केले की, हा दिवस या हुतात्म्यांच्या स्मरणाचा जसा आहे, तसा तो मुंबईसारखं शहर जे घडवण्यात मराठी माणसांनी स्वतःचा घाम, रक्त ओतलं आणि हे शहर आपल्याला मिळवण्यासाठी काय संघर्ष करावा लागला याचं स्मरण करण्याचा दिवस आहे.

पण मला गेली अनेक वर्ष एक गोष्ट प्रकर्षाने जाणवत आहे ती म्हणजे, सरकार जसे औपचारिकता म्हणून अनेक दिवस साजरे करतं तसा हा अजून एक सरकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आहे. या स्मारकाला नीट सजावट नव्हती, सगळा सरकारी अनुत्साह जाणवत होता. सरकारला आणि त्यांच्या विभागांना आपल्या महाराष्ट्र दिनाबद्दलची नक्की अनास्था कशातून आली आहे ?

वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात त्या राज्याच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा करत आनंद व्यक्त केला आणि वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवली तर काय होईल असा काही भाव सरकारच्या मनात आहे का ? हाच दिवस जैन समूहाचा किंवा तत्सम समूहाचा असता तर सरकाने सर्वत्र गालिचे अंथरले असते, रोषणाई केली असती, तिथे कधीही हात आखडता घेतला नसता. पण महाराष्ट्र राज्यासाठी, मुंबईसाठी, इथल्या माणसांसाठी जो आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, तिथे मात्र अगदी सुतकी पद्धतीने हा दिवस साजरा केला जातोय.

मला तर असं पण वाटून गेलं की सरकारची इच्छा लवकरात लवकर मराठी माणसाला या स्मारकाचा विसर पडावा अशी आहे की काय ?

बरं, सरकारकडून अपेक्षा आहेत पण त्या अपेक्षांची पूर्तता होणार नाही याची जवळपास खात्री पटली आहे.

पण मराठी माणसाला काय झालं आहे? मुंबईतील हुतात्मा स्मारक हे फक्त मुंबईतील नाही तर राज्यातील तमाम मराठी जनांसाठी अभिमानाचे प्रतीक असायला हवे. खरंतर या स्मारकाला एखाद्या तीर्थक्षेत्रासारखी गर्दी व्हायला हवी. इथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी फक्त मुंबई आणि आसपासच्या परिसरातून नाही तर राज्यभरातून धडकायला हव्यात. मिरवणुका निघायला हव्या. पण सरकार इतकीच अनास्था मराठी माणसाच्या मनात उत्पन्न का झाली आहे ? मुंबई हा आपल्या अस्मितेचा, स्वाभिमानाचा कणा आहे. हे शहर आपण मराठी माणसांनी घडवलं, याला आकार आपण दिला आणि आपण ते लढून मिळवलं. पण हे सगळं आपण विसरलो आहोत.

माझी मराठी माणसाला हात जोडून विनंती आहे की संयुक्त महाराष्ट्रचा लढा विसरू नका, आपलं हुतात्मा स्मारक विसरू नका. या हुतात्मा स्मारकाच्या आसपासची जी गगनचुंबी मुंबई दिसते ती हे शहर या राज्याचा भाग होतं म्हणून झाली आहे हे विसरू नका आणि याची जाणीव इतरांना देखील जास्तीत जास्त करून द्या. आणि याचा अभिमान बाळगा. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधल्या मराठी माणसांनी पुढच्या वर्षी आवर्जून १ मे ला इथे येऊन हुतात्म्यांना वंदन करा आणि राज्यातून मुंबईत येणाऱ्या मराठी माणसांनी देखील जरूर भेट द्या. हे झालं तर सरकारला पण दखल घ्यावी लागेल.

मी गेली अनेक वर्ष जे सातत्याने सांगतोय तेच पुन्हा सांगतो, जर आपण आपल्या भाषेचा, संस्कृतीचा, आणि प्रांताचा जाज्वल्य अभिमान बाळगला तर आणि तरच बाहेरचे आपल्या भाषेचा आणि प्रांताचा सन्मान करतील. हा दिवस अधिक उत्साहाने साजरा करण्याचे आवाहन करत राज ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande