
अमरावती, 01 मे, (हिं.स.)
‘आमच्या येथे येथे ईश्वर कृपेने व हजरत मकतुल्ला शाह बाबा यांच्या आशीर्वादाने मंगल कार्य करण्याचे योजिले आहे…’, हा मजकूर आहे विवाहपत्रिकेतील आणि तो ही मुस्लीम मुलाच्या पत्रिकेत. हा विवाह सोहळा नुकताच पार पडला. विशेष म्हणजे, या विवाह पत्रिकेत छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांनी अनुक्रमे मुस्लीम आणि हिंदू धार्मिक स्थळांबद्दल दाखविलेल्या उदारतेविषयी माहिती नमूद आहे. समाज माध्यमांवर ही लग्नपत्रिका प्रसारित झाली आहे. त्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
विवाह समारंभाच्या पत्रिकेतील भाष्य
वलगाव येथील ‘हिंदू मुस्लीम कौमी एकता मंच’ चे कार्यकर्ते शेख मजीद उर्फ मज्जूभाई यांचा मुलगा शोहेब अहमदचे लग्न अचलपूर तालुक्यातील पथ्रोट येथील मुस्लीम कुटुंबातील मुलीशी पार पडले. गेल्या २९ एप्रिल रोजी वलगाव येथे स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले. या विवाहाच्या निमित्ताने छापलेल्या लग्नपत्रिकेत आमचे प्रेरणास्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा आदरपूर्वक उल्लेख आहे.
लग्नपत्रिकेत नेमका काय उल्लेख?
टिपू सुलतान यांचे गुरू पुरनैय्या पंडित होते. टिपू सुलतान यांनी १५६ मंदिरांना जमीन दान दिली, तर काशीच्या मंदिरात १० हजार सोन्याचे शिक्के दान दिले होते. त्याचप्रमाणे गुरू याकूब शाह यांच्या दर्ग्यासाठी शिवाजी महाराजांनी १०० एकर जमीन दान दिली होती. तसेच रायगडावर जगदीश्वराच्या मंदिरासोबतच मशीदही बांधली असल्याचे लग्न पत्रिकेत नमूद केले आहे. या विवाहाच्या निमित्ताने दोन्ही शूरवीर राजांच्या धार्मिक दृष्टिकोनाबाबतची माहिती समाजबांधवांना कळावी, या अनुषंगाने ही पत्रिका तयार करण्यात आली.
यापुर्वीही अशाच स्वरूपाची पत्रिका
यापुर्वी वलगाव येथील ‘हिंदू मुस्लीम कौमी एकता मंच’ चे कार्यकर्ते अनिसभाई अहेमद मिर्झा यांच्या दोन मुलींच्या विवाहाच्या निमित्ताने छापलेल्या पत्रिकेत देखील छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या कार्याविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली होती. ३० ऑक्टोबर २०२२ रोजी वलगाव येथील सिकची मंगलम येथे हा विवाह सोहळा पार पडला होता. आमचे प्रेरणास्थान असा छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांचा उल्लेख होता. त्यावेळी या लग्नपत्रिकेची चांगलीच चर्चा झाली होती. सध्याच्या काळात धार्मिक तेढ वाढवण्यासाठी समाजातील काही प्रवृत्ती डोके वर काढत असताना सामाजिक, धार्मिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समुदायातील काही लोकांनी घेतलेला पुढाकार हा चर्चेचा विषय बनला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी