जलसंपदा विभागाचा प्रारंभ सोळाव्या शतकातच - उदय सामंत
रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । जलसंपदा विभागाचा प्रारंभ तसा सोळाव्या शतकातच झाला आहे. आता राबविले जाणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून 365 दिवस राबवावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामं
उदय सामंत


रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । जलसंपदा विभागाचा प्रारंभ तसा सोळाव्या शतकातच झाला आहे. आता राबविले जाणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन केवळ कृती पंधरवडा पुरते मर्यादित राहू नये. जनचळवळ म्हणून 365 दिवस राबवावा, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

कोकण पाटबंधारे विकास महामंडळ रत्नागिरी पाटबंधारे मंडळामार्फत जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्याचा समारोप पालकमंत्र्यांच्या उपस्थिती आज झाला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा नियोजन समिती सभागृहात झालेल्या या समारोप प्रसंगी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, अधिक्षक अभियंता महेश सुर्वे, कार्यकारी अभियंता विवेक सोनार, अर्थ व शिक्षण सभापती नंदकुमार बोरकर, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, उपसभापती गजानन महाडिक, शशिकांत चव्हाण, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी आदी उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने महाराष्ट्र पावन झाला आहे. छत्रपती शाहू महाराजांनी राधानगरीचे धरण बांधून जलसंपदा विभागाला प्रेरणा दिली. आजच्यासारखे प्रगत तंत्रज्ञान नसताना छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टीने आणि संकल्पनेने या धरणाची निर्मिती केली. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रापुरते मर्यादित नव्हते, देशपातळवरील राजे होते. अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून एक प्रकारे मंत्रालयाची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या शतकामध्ये केली होती. समुद्रामध्ये किल्ला बांधून त्यावर गोड्या पाण्याचा तलाव असावा, ही संकल्पना त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची होती. खऱ्या अर्थाने जलसंपदा विभाग सोळाव्या शतकात उदयाला आणला. याचा अभ्यास आपण करायला हवा.

श्री. सामंत म्हणाले, अतिशय प्रामाणिकपणे जिल्ह्यामध्ये हा पंधरवडा राबवला आहे. यातून पाणीटंचाईवर विचार करून योग्य नियोजन व्हायला हवे. राज्यामध्ये तीनशे कोटी झाडे लावायची आहेत. जलसंपदा विभागाने यामध्ये वन विभागाबरोबर पुढाकार घ्यावा. ती जगली पाहिजेत. त्याच्यासाठी उपाययोजनादेखील आपण सगळ्यांनी मिळून करण्याची गरज आहे. सामाजिक भान डोळ्यांसमोर ठेवून जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काम करावे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ साफ करण्याचा निर्णय डीपीसीमधून घेतला. नाम फाउंडेशनमार्फत दहा ते पंधरा कामे सुरू आहेत. त्यामुळे चिपळूणसारख्या शहरात गेल्या दोन-तीन वर्षांत पुराचे पाणी आलेले नाही. गावांची पाण्याची पातळी वाढण्यासही मदत झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जलयुक्त शिवार ही योजना राज्यात आणली होती. या योजनेमुळे महाराष्ट्रातल्या अनेक गावांची पाण्याची पातळी वाढली. सध्याच्या तापमानाचा आकडा बघितला, तर जलसाठ्यांचे बाष्पीभवन टाळायचे असेल तर फ्लोटिंग सौर प्रकल्प बसविण्याबाबत विचार करायला हवा. असा प्रयोग शीळ धरणावर पथदर्शी प्रकल्प म्हणून करू.

पिण्याच्या पाण्यासाठी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन पाणी टंचाईवर विचार केला पाहिजे. पाणीटंचाईवर या जिल्ह्याला मात करावीच लागेल. त्यादृष्टीने सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. पंधरवड्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर विभागाच्या अधिकाऱ्यांना टॅब आणि आधारकेंद्र चालकांना आधार संचाचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि सर विश्वेश्वरैय्या यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. सुर्वे यांनी केले. कार्यकारी अभियंता विवेक सोनार यांनी पंधरवड्यातील उपक्रमांची माहिती दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande