
रत्नागिरी, 01 मे (हिं.स.) । चिपळूण शहरासह ग्रामीण भागात वाढत चाललेल्या अवैध भंगार व्यवसायामुळे पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याला आणि जीवितास धोका निर्माण होत असल्याचा मुद्दा पुढे करत ‘हिंदू राष्ट्र समन्वय समिती’ने महाराष्ट्र दिनी चिपळूण येथे साखळी उपोषण आंदोलन छेडले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मानवंदना अर्पण करून या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. समितीच्या म्हणण्यानुसार गेल्या चार महिन्यांपासून जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वेक्षणातून हे व्यवसाय अवैध असल्याचे स्पष्ट होऊनही प्रशासनाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेमुळे नागरिकांमध्ये नाराजी वाढत असून, यापुढे केवळ निवेदने देण्यापुरते न थांबता कायदेशीर मार्गाने अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीने दिला आहे.
आजच्या साखळी उपोषणाचे नियोजन समितीचे अनुराग उतेकर, राजेश ओतारी, अजिंक्य ओतारी, आदित्य जोशी, सभापती निहार कोवळे, हेमंत चाळके, विलास इंगवले, प्रशांत उतेकर, आशीष आठवले व इतर कार्यकर्त्यांनी केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी