६७ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन : राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना
मुंबई, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली
६७ वा महाराष्ट्र राज्य स्थापना दिन: राज्यपालांची राष्ट्रध्वजाला मानवंदना


मुंबई, 01 मे (हिं.स.)। महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी शुक्रवारी (दि. १ मे) छत्रपती शिवाजी महाराज उद्यान मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रध्वज फडकावला, राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली व उपस्थितांना संबोधित केले. यावेळी राज्यपालांनी समारंभीय संचलनाचे निरीक्षण केले तसेच संचलनाकडून मानवंदना स्वीकारली.

मुख्य शासकीय सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी सुधा देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मुंबईच्या महापौर रितु तावडे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते, मुंबई महानगर पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पोलीस आयुक्त देवेन भारती, विविध देशांचे मुंबईतील वाणिज्यदूत, मानद वाणिज्यदूत, सशस्त्र सैन्य दलांचे वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासन व पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

राजशिष्टाचार सचिव राजेश गवांदे यांनी राज्यपालांच्या भाषणाचा मराठी अनुवाद वाचला.

यावेळी राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई सशस्त्र पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथक, बृहन्मुंबई सशस्त्र महिला पोलीस दल; मुंबई लोहमार्ग पोलीस दल, महाराष्ट्र पोलीस ध्वज, बृहन्मुंबई पोलीस ध्वज, राज्य राखीव पोलीस बल ध्वज, महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय ध्वज व बृहन्मुंबई अग्निशमन दल ध्वज यांचा समावेश असलेले ध्वज पथक, बृहन्मुंबई वाहतूक पोलीस दल, मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महानगर पालिका सुरक्षा दल, सुरक्षा रक्षक मंडळ तसेच ब्रास बँड व पाईप बँड वाद्यवृंद पथकाने संचलन केले.

मान्यवरांच्या भेटी व शुभेच्छा

कार्यक्रमानंतर राज्यपालांनी उपस्थित विविध देशांचे मुंबईतील राजदूत - वाणिज्यदूत तसेच सैन्य दलांचे व शासनाचे वरिष्ठ अधिकारी व सेवानिवृत्त अधिकारी यांचे जवळ जाऊन त्यांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande