
मुंबई, 01 मे (हिं.स.)। मुंबई महानगरपालिकेचे सह-आयुक्त विश्वास शंकरवार तसेच पी साऊथ वॉर्डाचे सहायक आयुक्त अनिरुद्ध कुलकर्णी यांनी आज कांदिवली पूर्व मतदारसंघाचे आमदार मा. अतुल भातखळकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेत ‘स्व-जन गणना मोहिमे’चा शुभारंभ आमदार भातखळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार अतुल भातखळकर यांनी स्वतः नोंदणी करून या महत्त्वपूर्ण मोहिमेत सहभाग नोंदवला.
देशाच्या इतिहासातील १६ वी जनगणना ही अत्यंत व्यापक आणि महत्त्वपूर्ण प्रक्रिया मानली जात असून, ती केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप ठरवणारी प्रक्रिया आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार, पायाभूत सुविधा, शहरी विकास, गरीब कल्याण योजना तसेच विविध संसाधनांचे प्रभावी नियोजन करण्यासाठी अचूक जनगणना अत्यंत आवश्यक ठरणार असून, डिजिटल आणि तंत्रज्ञानाधारित पद्धतीने जनगणना प्रक्रिया राबविण्यात येत असल्यामुळे ही मोहीम अधिक पारदर्शक, वेगवान आणि प्रभावी होणार असल्याचे भातखळकर यांनी सांगितले.
“प्रत्येक नागरिकाची अचूक माहिती देशाच्या विकासाला नवी दिशा देण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. ही जनगणना केवळ आकडेवारीपुरती मर्यादित नसून नागरिकांच्या गरजा, सुविधा आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या घराची अचूक नोंदणी करावी आणि योग्य माहिती देऊन प्रशासनाला सहकार्य करावे.” असे आवाहन आमदार अतुल भातखळकर केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर