टॅरिफच्या इशाऱ्यानंतर काही देशांनी स्थलांतरितांना स्वीकारण्यास सहमती दर्शवली- ट्रम्प
वॉशिंग्टन , 12 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमेबाबत आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईबाबत भाष्य केले. त्यांनी दावा केला की, अमेर
टॅरिफच्या इशाऱ्यानंतर काही देशांनी स्थलांतरितांना स्वीकारण्यास सहमती दर्शवली- ट्रम्प


वॉशिंग्टन , 12 मे (हिं.स.)।अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी बेकायदेशीररीत्या अमेरिकेत प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांविरोधात राबवण्यात आलेल्या मोहिमेबाबत आणि अमली पदार्थांविरोधातील कारवाईबाबत भाष्य केले. त्यांनी दावा केला की, अमेरिकेतून हद्दपार करण्यात आलेल्या स्थलांतरितांना स्वीकारण्यास तयार नसलेले देश टॅरिफ लावण्याच्या इशाऱ्यानंतर तयार झाले. तसेच अमेरिकेच्या सीमांवर जप्त करण्यात येणाऱ्या फेंटानिल या अमली पदार्थाच्या तस्करीत मोठी घट झाल्याचाही त्यांनी दावा केला.यासोबतच ट्रम्प यांनी अमेरिकेतील कायदा अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांच्या देशसेवेचे कौतुक केले. व्हाईट हाऊसमध्ये ‘पोलीस सप्ताहा’निमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या ‘रोझ गार्डन क्लब’ डिनर कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले.

ट्रम्प म्हणाले, “मी पदभार स्वीकारल्यापासून आमच्या सरकारने देशभरात सुमारे दोन लाख गुन्हेगारांना अटक केली आहे, जो एक विक्रम आहे. आम्ही त्यांना रस्त्यावरून हटवून तुरुंगात टाकत आहोत किंवा अनेक प्रकरणांमध्ये त्यांना त्यांच्या सुंदर देशांमध्ये परत पाठवत आहोत.”ते पुढे म्हणाले, “कधी कधी काही देश म्हणतात की आम्हाला हे लोक परत घ्यायचे नाहीत. तेव्हा मी सांगतो, काही हरकत नाही, त्या देशावर सुमारे 25 टक्के टॅरिफ लावा. त्यानंतर ते आम्हाला फोन करून सांगतात की आम्ही त्यांना तात्काळ परत घेण्यास तयार आहोत.” ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने मागील 12 महिन्यांत सुमारे 6 लाख 15 हजार बेकायदेशीर गुन्हेगार स्थलांतरितांना अमेरिकेबाहेर पाठवले आहे. त्यांनी असेही म्हटले की दक्षिणेकडील सीमेमार्गे एकाही बेकायदेशीर स्थलांतरिताला अमेरिकेत प्रवेश दिला गेला नाही.

फेंटानिल अमली पदार्थ तस्करीबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, सीमेमार्गे होणाऱ्या या तस्करीत 60 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. तसेच समुद्री मार्गाने होणाऱ्या तस्करीत 97 टक्के घट झाल्याचा दावाही त्यांनी केला. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट एजन्सी (आयसीई), गृह मंत्रालय, अमेरिकन मार्शल सेवा, ब्युरो ऑफ अल्कोहोल, टोबॅको, फायरआर्म्स अँड एक्सप्लोसिव्ह्ज, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) तसेच राज्य आणि स्थानिक पोलीस दलांचे कौतुक केले. या यशाचे श्रेय या संस्थांना देताना ट्रम्प म्हणाले, “हे सर्व खरे देशभक्त आहेत आणि अतिशय उत्कृष्ट लोक आहेत.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande