
इस्लामाबाद , 24 मे (हिं.स.) पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात रविवारी झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाने मोठी खळबळ उडाली. क्वेटामधील चमन फाटक रेल्वे स्थानकाजवळ लष्करी जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेला लक्ष्य करत करण्यात आलेल्या या शक्तिशाली स्फोटात किमान २४ जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट रेल्वे रुळांजवळ झाला, ज्यामुळे रेल्वेचे अंशतः नुकसान झाले आहे. स्फोट इतका भीषण होता की त्याच्या धक्क्याने आसपास उभ्या असलेल्या किमान १० वाहनांचा चक्काचूर झाला. तसेच, घटनास्थळाजवळील इमारतींच्या खिडक्या आणि काचेचे पॅनल पूर्णपणे फुटले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, मृतांमध्ये लष्करातील जवानांचाही समावेश आहे. स्फोटानंतर क्वेटामधील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे.परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन अतिरिक्त डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेत बोलावण्यात आले आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
स्फोटानंतर खबरदारीचा उपाय म्हणून पेशावरकडे जाणारी जाफर एक्सप्रेस क्वेटा रेल्वे स्थानकातच थांबवण्यात आली. प्रांतीय गृहमंत्र्यांचे प्रवक्ते बाबर युसुफझई यांनी सांगितले की, स्फोटानंतर संबंधित सर्व सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांनी नागरिकांना घटनास्थळाजवळ गर्दी न करण्याचे आवाहन केले असून, त्यामुळे बचाव पथके आणि आपत्कालीन सेवा कोणत्याही अडथळ्याशिवाय आपले काम सुरू ठेवू शकतील, असे त्यांनी म्हटले आहे.सध्या सुरक्षा दल आणि मदत पथके घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्याबरोबरच स्फोटाच्या कारणांचा तपासही सुरू करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode