
अमरावती, 13 मे (हिं.स.)।पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी रात्री सांस्कृतीक भवनमधून बाहेर जात असताना काही नागरिकांसोबत बोलत होते. त्यादरम्यान गाडगेनगर ठाण्यातील खुफिया अशोक वाटाणे यांनी त्यांचे फोटो काढले. ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दोन्ही डिसीपींना बोलावून संबंधित कर्मचाऱ्याला निलंबीत करण्याचे आदेश
दिले. रात्री २ वाजता पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी एएसआय अशोक वाटाणे यांच्या निलंबनाचा आदेश निर्गमित केला.भाजपाचे शहर जिल्हा अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांचा सोमवारी वाढदिवस असल्यामुळे सांस्कृतीक भवन येथे त्यांच्या वाढदिवसानिमीत्त अभिष्टचिंतन सोहळा होता. कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्यामुळे भाजपाचे सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रात्री १० वाजताच्या सुमारास कार्यक्रम आटोपल्यानंतर पालकमंत्री बाहेर निघाले तेव्हा काही व्यक्ती एका गुन्ह्या संदर्भात त्यांना भेटले आणि घडलेला प्रकार ते पालकमंत्र्यांना सांगत होते. त्यावेळी गाडगेनगर ठाण्यातील खुफिया अशोक वाटाणे यांनी स्वतःचा मोबाईल काढला आणि पालकमंत्री व संबंधित नागरिकांचा फोटो काढत होते. पालकमंत्र्यांच्या हे लक्षात येताच त्यांनी कर्मचाऱ्याला रागाने बोलावून विचारपूस केली. तो पोलीस कर्मचारी असल्याचे उघड होताच त्यांनी दोन्ही पोलीस उपायुक्तांना बोलाविले आणि संबंधित कर्मचाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली. भडकलेल्या पालकमंत्र्यांनी लगेच कर्मचाऱ्याला निलंबीत करण्याचे आदेश डिसीपींना दिले. पालकमंत्र्यांचा राग पाहता रात्रीच संबंधित बाबूला बोलावून २ वाजता पोलीस कर्मचारी अशोक वाटाणे यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात चांगलीच खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांत चांगल्याच चर्चा सुरू आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी