
परभणी, 25 मे (हिं.स.)।
सेलू-पाथरी रोडवरील रेल्वे गेट येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामासंदर्भात तसेच पुलावरून पाथरी व रवळगावकडे वळण रस्ता देण्याच्या मागणीला आता वेग आला आहे. या संदर्भात प्रशासन स्तरावर महत्त्वपूर्ण हालचाली सुरू झाल्या असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. संजय रोडगे यांनी नागरिक, शेतकरी, विद्यार्थी तसेच व्यापार्यांच्या होणार्या गैरसोयी लक्षात घेऊन पुलावरून रवळगावकडे वळण रस्ता देण्याची मागणी सातत्याने लावून धरली होती. परिसरातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनाही या मागणीचे महत्त्व पटवून देत त्यांनी यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता. या मागणीची दखल घेत जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित अधिकार्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेऊन विषयावर सविस्तर चर्चा केली. बैठकीत पुलावरील वाहतूक व्यवस्था, बाजारपेठेतील मालवाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा, रुग्णवाहिका तसेच गर्भवती महिलांना होणारा त्रास या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना येथील कार्यकारी अभियंता अनिस आलम यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन स्थळ पाहणी केली. त्यानंतर पालकमंत्री बोर्डीकर, सभापती डॉ. संजय रोडगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अँड. दत्तराव कदम, माऊली ताठे, पंचायत समिती सदस्य प्रभाकर गजमल, सरपंच दीपक रोडगे, अशोक लीपने, उपसरपंच संतोष रोडगे, सदस्य गुलाबराव रोडगे आदी पदाधिकार्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी पालकमंत्री बोर्डीकर यांनी संबंधित अधिकार्यांना या कामाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. रवळगाव जिल्हा परिषद सर्कलमधील विविध ग्रामपंचायतींनीही ठराव मंजूर करून या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक, व्यापारी व शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis