
लातूर, 25 मे (हिं.स.) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त मंगळवार दि. २६ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता बाभळगाव येथील विलासबाग येथे सार्वजनिक आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशमुख कुटुंबियांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात विलासरावजी देशमुख यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात येणार असून सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक हेमंत पेंडसे यांच्या ‘भाव स्वरांजली’ कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे.विलासराव देशमुख यांनी बाभळगावच्या सरपंचपदापासून मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा यशस्वी राजकीय प्रवास केला. त्यांच्या नेतृत्वामुळे ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळाली. मांजरा नदीवरील बॅरेज साखळीमुळे शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाले. त्यांच्या दिलदार, हजरजबाबी आणि संवेदनशील स्वभावामुळे ते सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळखले जात होते. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी सकाळी ८.४५ वाजता विलासबाग येथे उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis