
बीड, 14 मे (हिं.स.) : बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून गेवराईचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित आणि बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार संदीप क्षीरसागर यांच्यातील संघर्ष नव्या टप्प्यात पोहोचला आहे. विकासकामांच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
गेवराई मतदारसंघातील 11 विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार विजयसिंह पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत बैठक आयोजित केली होती. मात्र या बैठकीवर आमदार संदीप क्षीरसागर यांनी आक्षेप घेतला. बीड मतदारसंघातील विकासकामांमध्ये हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
आमदार संदीप क्षीरसागर म्हणाले की, “बीड मतदारसंघ हा माझा आहे. जनतेने दोन वेळा माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. विकासाच्या नावाखाली मतदारसंघातील कामे इतरत्र वळवण्याचा प्रयत्न झाला तर मी त्याला विरोध करणारच. संघर्षाची मला सवय आहे आणि गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू.”
या टीकेला प्रत्युत्तर देताना आमदार विजयसिंह पंडित यांनी भूमिका स्पष्ट केली. “मी घेतलेली बैठक ही गेवराई मतदारसंघातील विकासकामांसाठी होती. तसेच बीड नगरपरिषदेच्या काही प्रश्नांवरही चर्चा झाली. माझं बीडवर प्रेम आहे, आणि बीडकरांचेही माझ्यावर प्रेम आहे,” असे ते म्हणाले.
या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. स्थानिक पातळीवर दोन्ही नेत्यांमधील संघर्ष सातत्याने चर्चेत राहिला असून आता विकासकामांच्या मुद्द्यावरून तो अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, पंडित यांनी क्षीरसागर यांच्या कुटुंबावरही अप्रत्यक्ष टीका करत, “गेल्या तीन दशकांपासून नगरपालिकेत सत्ता होती, मग 165 कोटींच्या योजनेचे काय झाले?” असा सवाल उपस्थित केला. त्यामुळे बीडच्या राजकारणात नव्या संघर्षाला सुरुवात झाली असून आगामी राजकीय समीकरणांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis