
नाशिक, 15 मे (हिं.स.)।
– नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या बोधचिन्हावरून (लोगो) नव्या वादाला तोंड फुटले आहे. त्यात केवळ शैवपंथीय प्रतिके दाखवली गेली असून वैष्णव परंपरेच्या प्रतिकांचा अभाव आहे. कुंभमेळा शैव आणि वैष्णव परंपरेने होतो. त्यामुळे बोधचिन्हात वैष्णव परंपरांचे प्रतिक असलेल्या श्रीरामचंद्रांचे धनुष्यबाण समाविष्ट करावे. त्यानुसार आवश्यक ते बदल करण्याचा आग्रह नाशिकच्या वैष्णवपंथीय महंतांनी धरला आहे. दुसरीकडे बोधचिन्हावरून शैव आणि वैष्णवपंथीय असा वाद उद्भवण्याचे कारण नाही. प्रशासनाने स्पर्धेतून निवडलेले बोधचिन्ह सर्व १३ आखाड्यांना दाखवून अंतिम करायला हवे होते, असे शैवपंथीय आखाड्यांचे म्हणणे आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा बोधचिन्हाचे अनावरण बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत झाले. कुंभमेळा प्राधिकरणाच्यावतीने आयोजित बोधचिन्ह (लोगो) स्पर्धेत देश-विदेशातील ३०६७ स्पर्धक सहभागी झाले होते. यातून तज्ज्ञांच्या मंडळाने कुंभमेळ्यासाठी बोधचिन्हाची निवड केली. हे बोधचिन्ह नाशिक, त्र्यंबकेश्वरच्या धार्मिक परंपरांवर आधारीत असून त्यावर प्रादेशिक वारशाचे दर्शन, त्र्यंबकेश्वर मंदिराची प्रतिकृती आहे. अध्यात्मिक उर्जेचे प्रतीक असलेले भगवान शंकराचे त्रिशूळ, गोदावरी नदी शिवलिंग रुपात असल्याचे शासनाकडून सांगण्यात आले. बोधचिन्हावरून शैव आणि वैष्णव पंथीय आखाड्यांमध्ये वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. नाशिकला वैष्णवपंथीय तीन तर त्र्यंबकेश्वरला शैवपंथीय १० आखाडे आहेत. या दोन्ही पंथीय आखाड्यांमधील वाद नवीन नाहीत.
या बोधचिन्हाला नाशिकच्या श्री काळाराम मंदिराचे विश्वस्त तथा महंत सुधीरदास पुजारी यांनी आक्षेप घेतला. धर्मशास्त्राच्या दृष्टीने अनेक त्रुटी असून वैष्णव आखाडे आणि वैष्णव परंपरांच्या प्रतिकांचा बोधचिन्हात अभाव आहे. बोधचिन्हात श्रीरामचंद्रांचे धनुष्यबाण, गरूड भगवान असणे आवश्यक होते. कुंभातून अमृत पडताना दाखवायला हवे होते. बोधचिन्हात सर्व शैव चिन्हे आहेत. भगवान शंकर आमच्यासाठी पूजनीय आहेत. परंतु, वैष्णव परंपरांचे धनुष्यबाण प्रतिक दाखवायला पाहिजे होते. बोधचिन्हात त्र्यंबकेश्वरचे मंदिर दाखवले गेले. काळाराम मंदिर का नाही, असा प्रश्न त्यांनी केला. दोन्ही परंपरांन कुंभमेळा पार पडतो. शासनाने बोधचिन्हाविषयी पुनर्विचार करून वैष्णव चिन्हांचाही समावेश करावा, अशी मागणी महंत सुधीरदास यांनी केली.
चौकट
कुंभमेळ्याच्या बोधचिन्हात कलशातून अमृत पडताना दिसायला हवे होते. निवडलेले बोधचिन्ह फारसे उद्बोधक नाही. स्पर्धात्मक पद्धतीतून काही बोधचिन्हे निवडून ते सर्व १३ आखाड्यांना दाखवून सर्वानुमते एकाची निवड होणे अपेक्षित होते. तसे घडले नाही.
बोधचिन्हावरून शैव आणि वैष्णवपंथीय वेगळे करण्याची गरज नाही. दोन्ही एकच असून आपण सर्व सनातनी, वैदिक आहोत. बोधचिन्हावरील आक्षेप मुंबईतील बैठकीत लगेच मांडणे आवश्यक होते.
-शंकरानंद सरस्वती (आनंद आखाडा, त्र्यंबकेश्वर)
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV