
नवी दिल्ली, 16 मे (हिं.स.) : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इराणचे परराष्ट्र मंत्री सैयद अब्बास अराघची यांनी अमेरिकेवर गंभीर आरोप केले आहेत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याच्या मार्गात अमेरिका हा सर्वात मोठा अडथळा ठरत आहे. तसेच, हा संघर्ष थांबवण्यासाठी भारत महत्त्वाची आणि सकारात्मक भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ब्रिक्स देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीनंतर शुक्रवार, 15 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत अराघची म्हणाले की, तब्बल 40 दिवसांच्या संघर्षानंतर अमेरिकेला इराणविरोधातील आक्रमक धोरणातून कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येणार नाही हे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी चर्चेचा प्रस्ताव दिला. मात्र, आम्हाला अमेरिकेवर अजिबात विश्वास नाही. कोणत्याही राजनैतिक प्रयत्नांच्या मार्गातील हीच सर्वात मोठी अडचण असल्याचे त्यांनी सांगितले. पश्चिम आशियातील प्रश्नांचे सैनिकी समाधान शक्य नाही आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारतासारख्या विश्वासार्ह देशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरू शकते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यासोबतच आराघची म्हणाले की, भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा आहे. फारसच्या आखातातील सर्व देशांशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे भारताने या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी रचनात्मक भूमिका बजावावी, अशी आमची अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
होर्मुज सामुद्रधुनीबाबत बोलताना अराघची म्हणाले की, इराण जगभरातील जहाजांसाठी हा मार्ग खुला ठेवण्यास तयार आहे. मात्र, जे देश तेहरानविरोधात युद्धस्थितीत आहेत, त्यांच्या जहाजांना अपवाद असेल. सध्याची परिस्थिती अत्यंत गुंतागुंतीची असल्याचेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी भारत-इराण सहकार्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या चाबहार बंदर प्रकल्पाचाही उल्लेख केला. “या बंदराच्या विकासात भारताने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. अमेरिकन निर्बंधांमुळे प्रकल्पाची गती काहीशी मंदावली असली, तरी भविष्यात हे बंदर भारतासाठी मध्य आशिया, कॉकसस आणि युरोपकडे जाणारे महत्त्वाचे प्रवेशद्वार ठरेल असे अराघची यांनी स्पष्ट केले. तसेच, भारताने चाबहार बंदराच्या विकासाचे काम पुढेही सुरू ठेवावे, जेणेकरून या प्रकल्पाचा लाभ भारतासह इतर शेजारी देशांनाही होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
-------------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी