
रायगड, 15 मे (हिं.स.)। खालापूर तालुक्यातील तांबाटी गाव परिसरात असलेल्या गोदरेज कंपनीच्या स्टोअर रूममध्ये अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे साडेतीन लाख रुपयांचे साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे औद्योगिक परिसरात खळबळ उडाली असून पोलीसांनी अज्ञात आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मौजे तांबाटी गाव हद्दीतील गोदरेज कंपनीच्या स्टोअर रूममध्ये अज्ञात आरोपींनी रात्रीच्या सुमारास स्टोअर रूमचा पत्रा कापून आत प्रवेश केला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या हेतूने स्टोअरमधील मौल्यवान साहित्य चोरून नेले. चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये कॉपर फिश प्लेट तसेच विविध इलेक्ट्रिक साहित्याचा समावेश असून त्याची एकूण किंमत 3 लाख 38 हजार 166 रुपये इतकी असल्याचे समोर आले आहे.
घटना लक्षात येताच कंपनी प्रशासनाने तत्काळ खालापूर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा क्रमांक 189/2026 नोंदवून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 331(3), 331(4) आणि 305(a) प्रमाणे अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
औद्योगिक क्षेत्रात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंपनी परिसरात रात्रीच्या वेळी सुरक्षा यंत्रणा असूनही चोरट्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली आहे. तसेच चोरीतील आरोपींचा लवकरच माग काढण्यात येईल, असा विश्वास पोलीसांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)