
जळगाव, 15 मे (हिं.स.) सध्या ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरमसाठ परताव्याचे आमिष दाखवून जिल्ह्यातील २७९ गुंतवणूकदारांची सुमारे २३ कोटी ८१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांनी दिलेल्या अधिकृत फिर्यादीवरून ‘टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. पुणे’ या कंपनीविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कंपनीचा जळगाव शाखेचा मुख्य एजंट मिलिंद शालिकराव पाटील याला पोलिसांनी अटक केली आहे. डिसेंबर २०२० ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत संशयितांनी शहरासह विविध भागांत मोठमोठे सेमिनार, बैठका आणि प्रचार मोहिमा राबवत नागरिकांना गुंतवणुकीस प्रवृत्त केले. अल्पावधीत मोठा नफा मिळेल, असे आश्वासन देत २७९ गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप आहे.
तपासात कंपनीकडून बनावट करारनामे, वाढीव नफ्याचे सादरीकरण आणि खोट्या आर्थिक योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आल्याचे उघड झाले आहे. अनेक गुंतवणूकदारांनी आपली आयुष्यभराची बचत, निवृत्ती वेतनाची रक्कम तसेच कर्ज काढून या योजनेत पैसे गुंतवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील विशेष बाब म्हणजे, अटक करण्यात आलेल्या मिलिंद पाटीलने सुरुवातीला स्वतःच कंपनीच्या संचालकांविरोधात तक्रार दिली होती. मात्र, आर्थिक गुन्हे शाखेच्या सखोल तपासात तोच कंपनीचा जळगाव फ्रँचायझी प्रमुख असल्याचे निष्पन्न झाले. गुंतवणूकदारांकडून थेट पैसे स्वीकारणे, करारनामे करून देणे आणि नवीन गुंतवणूकदार जोडण्यासाठी प्रोत्साहन देणे, अशी भूमिका तो बजावत होता. यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर कमिशन मिळत असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. पोलिसांनी बँक व्यवहार, आर्थिक कागदपत्रे, करारपत्रे आणि गुंतवणूकदारांचे जबाब तपासल्यानंतर मिलिंद पाटीलला अटक केली. या घोटाळ्यात आणखी काही एजंट आणि सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून तपासाचा फेरा वाढवण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीचे मुख्य संचालक समीर सुभाष नार्वेकर आणि नेहा समीर नार्वेकर यांच्याविरोधात राज्यातील विविध शहरांत आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, रत्नागिरी आणि छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्यावर गुन्हे नोंदवले गेले आहेत. ठाणे पोलिसांनी जानेवारी २०२६ मध्ये या दोघांना अटक केली असून सध्या ते नागपूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी पाळधी येथील भरत रतीलाल पवार यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता तसेच बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम २०१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी नागरिकांना अवास्तव परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर